दीपिकाने घेतले तब्बल पंधरा कोटींचे मानधन! | पुढारी

दीपिकाने घेतले तब्बल पंधरा कोटींचे मानधन!

मुंबई : दीपिका पदुकोण बर्‍याच दिवसांपासून मोठ्या पडद्यावर झळकलेली नसली तरी कोणत्या ना कोणत्या कारणाने ती चर्चेत असतेच. ‘छपाक’ नंतर तिचा एकही चित्रपट आलेला नाही. पती रणवीर सिंहबरोबर ती आगामी ‘83’ मध्ये दिसणार आहे. बॉलीवूडमधील ड्रग्ज प्रकरणात नाव आल्याने एनसीबीने तिची चौकशी केली होती व त्यावेळी ती चर्चेत आली होती. आता ती यशराज फिल्म्सच्या आगामी ‘पठाण’ या चित्रपटासाठी तिने घेतलेल्या घसघशीत मानधनामुळे चर्चेत आली आहे. या चित्रपटासाठी तिने तब्बल पंधरा कोटी रुपयांचे मानधन घेतले आहे. या चित्रपटात शाहरूख खान आणि जॉन अब्राहम यांच्यासमवेत ती दिसणार आहे.

सिद्धार्थ आनंद यांच्या दिग्दर्शनाखाली हा अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपट बनणार आहे. हा एक बिग बजेट चित्रपट असून त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. एकट्या दीपिकालाच या चित्रपटासाठी चौदा ते पंधरा कोटी रुपये मेहनताना देण्यात आल्याचे वृत्त आहे. या चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षी सुरू होईल. जॉन अब्राहमला या चित्रपटासाठी वीस कोटी रुपये दिल्याचेही म्हटले जाते. अशा स्थितीत सुपरस्टार शाहरूख खानला किती मानधन दिले असेल याची कल्पनाच केलेली बरी! या चित्रपटात जॉन खलनायकाच्या भूमिकेत असेल. ‘पठाण’साठी सुमारे दोनशे कोटी रुपयांचे बजेट तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये सध्या तरी शाहरूखच्या मानधनाचा समावेश नाही. हा बॉलीवूडमधील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक ठरणार आहे.

Back to top button