जंगलात वाघोबाने टिपली सेल्फी! | पुढारी | पुढारी

जंगलात वाघोबाने टिपली सेल्फी! | पुढारी

नवी दिल्ली : एका माकडाने टिपलेली सेल्फी बरीच प्रसिद्ध झाली होती व या फोटोचे श्रेय कॅमेर्‍याचा मालक असलेल्या फोटोग्राफरचे की संबंधित माकडाचे या विषयावर वादही झाला होता. आता सोशल मीडियात एका वाघाने टिपलेली सेल्फी व्हायरल झाली आहे. जणू काही एखादा माणूस सेल्फी कॅप्चर करीत असावा अशा थाटात हा वाघ या फोटोमधून दिसून येतो.

जंगलांमध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कारणांसाठी कॅमेरे लावलेले असतात. त्यामधून वन्यजीवन समजावे असा हेतू असतो. अशाच एका कॅमेर्‍यात ही प्रतिमा टिपली गेली आहे. हे छायाचित्र ‘बॅक टू नेचर’ नावाच्या ट्विटर पेजवर शेअर करण्यात आले आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे ‘टायगर सेल्फी’. हा फोटो सोशल मीडियात येताच तो व्हायरल झाला. यूजर्सनी या फोटोबाबत अनेक प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. एरव्ही माणसाला सेल्फीची क्रेझ असते व अनेक लोक कुठेही दात विचकून किंवा पार्श्वभूमीवरील एखादी खास घटना, वास्तू किंवा वस्तू दाखवून सेल्फी टिपत असतात. अशी सेल्फी सोशल मीडियात शेअर करून प्रतिक्रियांची वाट पाहत बसण्याचा अनेकांना (फावल्या वेळेचा) छंद असतो. अशा फोटोंचा अनेकांना कंटाळाही असतो. मात्र, वाघोबाने जंगलात टिपलेली ही सेल्फी लोकांना चांगलीच आकर्षित करीत आहे!

 

Back to top button