दहा पटीने वाढले ब्रह्मांडाचे तापमान | पुढारी

दहा पटीने वाढले ब्रह्मांडाचे तापमान

ओहिओ :

अलीकडच्या काळात वेगाने वाढत असलेल्या तापमानाबद्दल शास्त्रज्ञांनी मोठी चिंता व्यक्‍त केली आहे. या शास्त्रज्ञांच्या मते, सातत्याने वाढत असलेले तापमान हे केवळ पृथ्वीसाठीच नव्हे तर संपूर्ण ब्रह्मांडासाठी चिंतेचा विषय आहे. ‘ओहिओ स्टेट युनिव्हर्सिटी सेंटर फॉर कॉस्मॉलॉजी’ आणि ‘अ‍ॅस्ट्रोपार्टिकल फिजिक्स’च्या वतीने करण्यात आलेल्या या संशोधनातील दाव्यानुसार ब्रह्मांडाचे तापमान वेगाने वाढत आहे. गेल्या 10 अब्ज वर्षांतील ब्रह्मांडाच्या थर्मल इतिहासाचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

या संशोधनातील माहितीनुसार गेल्या 10 अब्ज वर्षांत ब्रह्मांडाचे तापमान तब्बल 10 पटीने वाढले आहे. ब्रह्मांडाचे तापमान सध्या 20 लाख केल्विनपर्यंत पोहोचले आहे. म्हणजेच हे तापमान सुमारे 4 दशलक्ष अंश फॅरेनाईट इतके आहे.

संशोधनातील माहितीनुसार ब्रह्मांडाच्या विकासाबरोबरच गुरुत्वाकर्षण हे अवकाशातील काळे पदार्थ, गॅसबरोबरच आकाशगंगा आणि आकाशगंगांच्या समूहाला आपल्याकडे खेचून घेते. या प्रक्रियेतून बाहेर पडणार्‍या ऊर्जेमुळे भीषण तापमानाची निर्मिती होत आहे. यामुळेच गेल्या 10 अब्ज वर्षांत ब्रह्मांडाचे तापमान तब्बल 10 पटीने वाढले आहे. 

ब्रह्मांडातील वाढत्या तापमानाबद्दल संशोधन करणार्‍या शास्त्रज्ञांनी पृथ्वीपासून दूर असलेल्या वायूचे मोजणी करणार्‍या एका नव्या विधीचा या संशोधनासाठी वापर केला. 

Back to top button