‘या’ जोडप्याने विकसित केली कोरोनावरील ‘फायझर’ लस | पुढारी

‘या’ जोडप्याने विकसित केली कोरोनावरील ‘फायझर’ लस

न्यूयॉर्क : सध्या अवघे जग कोरोना विषाणू व त्यामुळे होणार्‍या ‘कोव्हिड-19’ या आजारावरील लसीच्या प्रतीक्षेत आहे. आता डॉ. उगर साहीन व त्यांच्या पत्नी डॉ. ओझलेम ट्युरेसी यांच्या ‘बायोएन्टेक’ कंपनीने बनवलेली लस सर्वप्रथम जगभरातील लोकांसमोर येऊ शकते. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी या दाम्पत्याने बर्लिनमध्ये संसर्गजन्य रोगांबाबतच्या तज्ज्ञांच्या एका परिषदेत म्हटले होते की जर एखादी जागतिक महामारी उद्भवली तर त्यांची कंपनी मेसेंजर आरएनए तंत्राच्या मदतीने त्या रोगावरील लस विकसित करू शकेल.

त्यावेळी ‘बायोएन्टेक’ ही त्यांची कंपनी युरोपमधील छोट्या बायोटेक्नॉलॉजी स्टार्टअप विश्वाच्या बाहेर कुणालाही माहिती नव्हती. त्यावेळी कोरोना विषाणूची महामारी पसरली नव्हती आणि ‘कोव्हिड-19’ हे नावही कुणी ऐकले नव्हते. कर्करोगावरील संशोधनासाठी या दाम्पत्याने सुरू केलेल्या ‘बायोएन्टेक’ कंपनीने आता कोरोना महामारीच्या काळात लाखो लोकांचे जीव वाचवण्यासाठी प्रभावी लस विकसित केली आहे. कोरोनाची लागण न झालेल्या स्वयंसेवकांवर त्यांच्या लसीची चाचणी घेण्यात आली. ही लस कोरोना विषाणूला रोखण्यासाठी 90 टक्के यशस्वी ठरल्याचे दिसून आले व त्याबाबतची घोषणा ‘फायझर’ व ‘बायोएन्टेक’ कंपनीने गेल्याच आठवड्यात केली. त्यानंतर जगभरात बारा लाख बळी घेणार्‍या कोरोना विषाणूवर लस तयार करणार्‍या कंपन्यांच्या स्पर्धेत फायझर व बायोएन्टेक कंपनी सर्वात आघाडीवर आली. ‘कोरोना काळाच्या शेवटाची ही नांदी आहे’, असे उद्गार डॉ. उगर यांनी काढले आहेत.

 

Back to top button