अलास्काच्या ग्लेशियरमुळे भयावह त्सुनामीची भीती | पुढारी

अलास्काच्या ग्लेशियरमुळे भयावह त्सुनामीची भीती

न्यूयॉर्क : अलास्कामधील बॅरी आर्म ग्लेशियर आता वेगाने वितळत चालले आहे. त्याच्या बर्फाखाली असणारी माती हळूहळू घसरत आहे. अतिशय जास्त वजनाचे बर्फ असल्यामुळे ही माती घसरत आहे. हे ग्लेशियर कधीही तुटू शकते व त्याचा भाग समुद्रात कोसळून भयावह त्सुनामी येऊ शकते असा इशारा संशोधकांनी दिला आहे.

बॅरी आर्म ग्लेशियर एका अरुंद सागरी मार्गावर असून त्याच्या दोन्ही बाजूंना उंच असे हिमाच्छादीत पर्वत आहेत. अशा प्रकारचे स्थान त्सुनामी निर्माण करण्यासाठी पोषक असते. ग्लेशियरच्या बर्फाची दरड कोसळून ती समुद्रात पडली तरी मोठी त्सुनामी येऊ शकते. त्यामुळे किनारपट्टीवर राहणार्‍या मानवी वसाहतीला धोका निर्माण होऊ शकतो. ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीच्या बायर पोलर अँड क्लायमेट रिसर्च सेंटरच्या चुनली दाई या संशोधकाने सांगितले की बॅरी आर्म जोर्ड हे 2010 ते 2017 या काळात 120 मीटरपर्यंत घसरले आहे. अजूनही ते हळूहळू पुढे घसरत चालले आहे. जर ते वेगाने तुटून समुद्रात कोसळले तर त्याचा परिणाम महाभयानक होऊ शकतो. ज्यावेळी पर्वताच्या उतारावरील बर्फ वितळून पडू लागतो त्यावेळी दरड कोसळण्याचा धोका वाढतो. त्याचे प्रमाण मोठे असेल तर त्सुनामीचा धोका वाढतो. अशीच एक त्सुनामी 2017 मध्ये पश्चिम ग्रीनलँडमध्ये आली होती. अलास्काचे बॅरी आर्म ग्लेशियर पाहण्यासाठी अनेक पर्यटकही जात असतात. ग्लेशियरच्या आसपास चुगैक समुदायाचे लोक राहतात.

 

Back to top button