‘थलायवी’च्या शेवटच्या शेड्यूलसाठी कंगना हैदराबादमध्ये! | पुढारी

‘थलायवी’च्या शेवटच्या शेड्यूलसाठी कंगना हैदराबादमध्ये!

मुंबई :

धाकटा भाऊ अक्षत याच्या विवाहसोहळ्यानंतर कंगना रणौत ‘थलायवी’ चित्रपटाच्या शेवटच्या शेड्यूलसाठी आता मनालीहून हैदराबादला रवाना झाली आहे. तिने स्वतःच ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. हिमालयाच्या पर्वतराजीचा निरोप घेऊन जाणे हे माझ्यासाठी सहजसोपे कधीही नसते, असे तिने भावूक होऊन म्हटले आहे.

तिने म्हटले आहे की माझ्या परीक्षेच्या खडतर काळात मला आश्रय दिल्याबद्दल मी हिमालयाचे आभार मानते. मी लवकरच कधीही परत येऊ शकते! कंगनाने यापूर्वी ऑक्टोबरमध्ये ‘थलायवी’चे एक शेड्यूल पूर्ण केले होते. त्यावेळी तिने शूटिंगचे फोटो शेअर करून म्हटले होते की जया माँ यांच्या आशीर्वादाने ‘थलायवी ः द रिव्होल्युशनरी लीडर’चे एक शेड्यूल पूर्ण झाले. कोरोनानंतर अनेक गोष्टी बदलल्या आहेत; पण अ‍ॅक्शननंतर व कटच्या आधी काही बदललेले नाही. लॉकडाऊननंतर कंगनाने 4 ऑक्टोबरपासून या चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू केले होते. अभिनेत्री ते मुख्यमंत्री असा प्रवास केलेल्या तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. तो हिंदी, तामिळ आणि तेलगू भाषेत प्रदर्शित होईल.

Back to top button