अहो आश्‍चर्यम्! वृद्ध बनले ‘तरुण’! | पुढारी

अहो आश्‍चर्यम्! वृद्ध बनले ‘तरुण’!

तेल अवीव :

च्यवन नावाच्या अतिशय वृद्ध ऋषींना देवतांचे वैद्य असलेल्या दोघा अश्‍विनीकुमारांनी पुन्हा तरुण बनवल्याची कथा पुराणांमध्ये आहे. आधुनिक काळातही वृद्धावस्था रोखण्यासाठी किंवा तारुण्य पुन्हा मिळवण्यासाठी संशोधने सुरू असतात. आता इस्रायलमधील संशोधकांनी मानवी शरीरातील दोन प्रमुख क्षेत्रांमध्ये होणार्‍या प्रक्रियांना उलटे करून वृद्धांना पुन्हा ‘तरुण’ बनवल्याचा दावा केला आहे. ‘ह्युमन क्लॉक’ म्हणजेच मानवी शरीराच्या नैसर्गिक घड्याळालाच त्यांनी उलटे फिरवले आहे!

‘एजिंग’ नावाच्या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार रिसर्च अँड डेव्हलपमेंट युनिटच्या संशोधकांनी हा प्रयोग केला आहे. वयोमानानुसार शरीर वृद्ध होत जाते. मात्र, संशोधकांनी हायपरबेरिक ऑक्सिजन थेरेपीचा वापर करून या जैविक चक्राला उलटे करण्याचा प्रयत्न केला. शमीर मेडिकल सेंटरमधील याफित हचमो यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी 64 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या 35 वृद्ध लोकांच्या शरीरातील हे ‘ह्युमन क्लॉक’ उलटे फिरवले. उतारवयात शरीराला दुर्बल व रोगग्रस्त करणार्‍या दोन प्रमुख क्षेत्रांतील प्रक्रियांची दिशा त्यांनी उलट केली. गुणसूत्रांच्या डोक्यावरील सुरक्षात्मक शिरस्त्राणांना ‘टेलोमेरेस’ असे म्हटले जाते. उतारवयाबरोबर ते छोटे होत जातात व डीएनए क्षतिग्रस्त होतात. परिणामी, पेशींची पुनर्निमितीची प्रक्रिया बंद होत जाते. याच काळात सेन्सेंट पेशींचीही शरीरात निर्मिती होते ज्या पुनर्निमितीची क्रिया थांबवतात. आता इस्रायलच्या या संशोधकांनी दावा केला आहे की त्यांनी ही प्रक्रिया उलट केली आहे. ‘अँटी एजिंग रिसर्च’चा भर ‘टेलोमेरेस’ची लांबी वाढवणे आणि सेन्सेंट पेशींपासून सुटका करवून घेणे हा असतो. औषधांच्या माध्यमातून वयोवृद्ध लोकांच्या शरीरात या दोन क्षेत्रांमध्ये काम केले जाते. या संशोधनात एका हायपरबेरिक चेम्बरमध्ये 35 वृद्ध लोकांना आळीपाळीने शुद्ध ऑक्सिजन देण्यात आले. त्यामुळे त्यांच्या टेलोमेरेसची लांबी 20 टक्क्यांपर्यंत वाढली. 25 वर्षांपूर्वी त्यांची जी लांबी होती ती या क्रियेने मिळवण्यात संशोधकांना यश आले.

Back to top button