चित्रपटगृहात झळकणार ‘इंदू की जवानी’! | पुढारी

चित्रपटगृहात झळकणार ‘इंदू की जवानी’!

मुंबई :

सध्याच्या ‘अनलॉक’च्या काळात आता चित्रपटगृहेही खुली झाली आहेत. त्यामुळे अनेक निर्मात्यांनी आता आपले चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकवण्याची तयारी केली आहे. काहींनी आतापर्यंत यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मचा मार्ग अवलंबला होता. मात्र, कियारा अडवाणी हिची मुख्य भूमिका असलेला ‘इंदू की जवानी’ हा चित्रपटही आता चित्रपटगृहातच प्रदर्शित केला जाणार आहे.

हा चित्रपट नोव्हेंबरमध्ये पडद्यावर येणार, तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर येईल, अशा स्वरूपाच्या चर्चा आधी होत्या. मात्र, आता या चित्रपटाचे प्रदर्शन डिसेंबरमध्ये चित्रपटगृहातच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नोव्हेंबरमध्ये चित्रपटगृहे खुली झाल्यावर प्रदर्शित होणारा हा पहिलाच चित्रपट ठरेल अशीही चर्चा होती; पण चित्रपटाचे प्रदर्शन आणखी लांबले. मनोज वाजपेयी, दिलजीत दोसांझ, सुप्रिया पिळगावकर आणि फातिमा सना शेख यांचा ‘सूरज पर मंगल भारी’ हा चित्रपट सर्वात आधी दिवाळीच्या दरम्यान चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. हा कियारा अडवाणी आणि आदित्य सील यांच्या भूमिका असलेला ‘इंदू की जवानी’ हा चित्रपट 11 डिसेंबर 2020 मध्ये प्रदर्शित होईल. ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी सोशल मीडियावरून त्याची पुष्टी केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अबीर सेनगुप्‍ता यांनी केले असून कियाराची यामध्ये एका अल्‍लड तरुणीची भूमिका आहे.

Back to top button