कॅटरिनाने करून घेतली ‘चाचणी’ | पुढारी | पुढारी

कॅटरिनाने करून घेतली ‘चाचणी’ | पुढारी

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे जगभरातील बहुतेक देशांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. याचा फटका सिने क्षेत्रालाही बसला. अनेक चित्रपटांचे प्रदर्शन तर काहींचे चित्रीकरणच थांबले. मात्र, देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आणि हळूहळू सर्व काही पूर्वपदावर येऊ लागले आहे. प्रशासनाने लागू केलेल्या नियमांचे पालन करत सध्या अनेक चित्रपटांच्या चित्रीकरणास सुरुवात झाली आहे. कोरोनामुळे खबरदारीही घेण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री कॅटरिना कैफनेही नुकतीच आपली कोविड टेस्ट करून घेतली. कॅटरिनाने आपल्या सोशल मीडिया हँडलवर कोरोना टेस्ट करून घेत असल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी तिने लिहिले आहे की, टेस्ट निश्‍चितपणे करण्यात यावी. 

या व्हिडीओत एक वैद्यकीय कर्मचारी पीपीई किट घालून कॅटरिनाचे स्राव घेत असल्याचे दिसत आहे. कॅटरिना कैफ आता लवकरच ‘भारत’चे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्या चित्रपटात काम करताना दिसणार आहे. यामध्ये ती एका सुपरवूमनच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय कॅटरिनाचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहे. बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार हा ‘सूर्यवंशी’मध्ये प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय कुमार आणि कॅटरिना हे दोघे दीर्घकाळानंतर पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. याशिवाय कॅटरिना आता सिद्धांत चतुर्वेदी व इशान खट्टरसोबत ‘फोन भूत’मध्ये दिसणार आहे.

Back to top button