पृथ्वीच्या दिशेने येत आहे 820 मीटर आकाराचा लघुग्रह | पुढारी

पृथ्वीच्या दिशेने येत आहे 820 मीटर आकाराचा लघुग्रह

वॉशिंग्टन : पृथ्वीच्या जवळून अनेक लघुग्रह पुढे जात असतात. अलीकडच्या काही दिवसांमध्येही असे अनेक लघुग्रह पृथ्वीजवळून गेले आहेत. आता पुन्हा एकदा पृथ्वीच्या दिशेने एक लघुग्रह येत असल्याचे ‘नासा’ने म्हटले आहे. या लघुग्रहाचा आकार जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या ‘बुर्ज खलिफा’ इतका आहे. ताशी 90 हजार किलोमीटर वेगाने येत असलेल्या या लघुग्रहाचा आकार सुमारे 820 मीटर आहे. 29 नोव्हेंबरला हा लघुग्रह पृथ्वीजवळून जाईल.

या लघुग्रहाला ‘153201 2000 डब्ल्यू ओ 107’ असे नाव देण्यात आले आहे. दुबईतील ‘बुर्ज खलिफा’ची उंची 829 मीटर आहे तर हा लघुग्रह सुमारे 820 मीटर आकाराचा आहे. पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधील सरासरी अंतर 3 लाख 85 हजार किलोमीटर आहे. मात्र, ‘नासा’ने या अंतरातील सुमारे वीस पट श्रेणीत येणार्‍या प्रत्येक गोष्टीचे निरीक्षण करण्यास प्राधान्य दिले आहे. या उल्केचा आकार आणि वेग पाहता थोडी चिंतेची बाब असली तरी पृथ्वीला त्याच्यापासून धोका नसल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. मंगळ आणि गुरू या ग्रहांदरम्यान अशा अनेक लघुग्रहांचा एक पट्टाच आहे. त्यामधील लघुग्रह अनेकवेळा पृथ्वीजवळून जात असतात. अशाच एका लघुग्रहाच्या धडकेनंतर पृथ्वीवरून डायनासोरचे साम्राज्य नष्ट झाले होते.

Back to top button