लघुग्रहावरून नमुने घेऊन डिसेंबरमध्ये येणार जपानी यान | पुढारी

लघुग्रहावरून नमुने घेऊन डिसेंबरमध्ये येणार जपानी यान

टोकियो : आपली सौरमालिका कशी बनली याच्या अभ्यासासाठी जपानने एक यान अंतराळात फिरत असलेल्या लघुग्रहावर पाठवले होते. त्यावरील मातीचे नमुने व संबंधित डेटा घेऊन हे यान डिसेंबरमध्ये पृथ्वीवर परतणार आहे. सध्या हे यान परतीच्या प्रवासात असून ते 6 डिसेंबरला पृथ्वीवर उतरेल.

‘हायाबुसा-2’ असे या यानाचे नाव आहे. त्याला एक वर्षापूर्वी पृथ्वीपासून 30 कोटी किलोमीटरवर असलेल्या ‘रियुगू’ नावाच्या लघुग्रहाकडे पाठवण्यात आले होते. आता त्याचे कॅप्सूल 6 डिसेंबरला दक्षिण ऑस्ट्रेलियात लँड होईल. जपानच्या अंतराळ संशोधन संस्थेतील संशोधकांनी म्हटले आहे की या यानातून मिळणारा डेटा व लघुग्रहाच्या मातीचे नमुने अतिशय उपयुक्त ठरतील. माकोटो योशिकावाच्या प्रोजेक्ट मॅनेजरनी सांगितले की वैज्ञानिक रियुगूच्या मातीमधील घटकांचे विश्लेषण करतील. ‘जाक्सा’ नावाच्या जपानी अंतराळ संशोधन संस्थेने म्हटले आहे की या यानाच्या कॅप्सूलला ऑस्ट्रलियात 2.2 लाख किलोमीटरच्या उंचीवरून खाली आणण्यात येईल. हिट शिल्डने सुरक्षित असलेले हे कॅप्सूल पृथ्वीपासून 200 किलोमीटर उंचीवरून आगीच्या गोळ्याच्या रूपात खाली येईल. सुमारे दहा किलोमीटर उंचीवर त्यामधील पॅराशूट उघडून त्याचे सॉफ्ट लँडिंग होईल. लँडिंगनंतर या अवघ्या 40 सेंटीमीटर व्यासाच्या कॅप्सूलचा निश्चित ठावठिकाणा समजण्यासाठी त्यामध्ये अनेक सॅटेलाईट डिशही लावण्यात आल्या आहेत.

 

Back to top button