थंड पाण्यातही ‘शिजणारा’ तांदूळ! | पुढारी | पुढारी

थंड पाण्यातही ‘शिजणारा’ तांदूळ! | पुढारी

पाटणा : तांदळाचे अनेक प्रकारचे वाण जगभरात पाहायला मिळत असते. मात्र, बिहारमध्ये आढळणारा ‘मॅजिक राईस’ खरोखरच वेगळा आहे. हा तांदूळ अग्नीवर शिजवावा लागत नाही. तो साध्या, थंड पाण्यात घालून ठेवला तरी काही वेळात शिजवलेल्या भातासारखा फुलतो!

साध्या पाण्यातही फुलत असल्याने त्याला ‘मॅजिक राईस’ असे नाव पडले आहे. अशा तांदळाचे उत्पादन बिहारच्या चंपारण्य जिल्ह्यातील हरपूर नावाच्या गावात राहणार्‍या विजय गिरी या शेतकर्‍याने घेतले आहे. दहावीपर्यंत शिकलेल्या विजय यांनी गव्हाचे व अन्य पिकांचेही नवे वाण तयार केले आहे. ‘मॅजिक राईस’चे वैशिष्ट असे की ते सामान्य पाण्यात अर्धा किंवा पाऊण तास भिजवून ठेवला की ‘शिजतो’ आणि शिजवलेल्या भातासारखाच स्वाद देतो. त्याला चुलीवर किंवा कुकरमध्ये शिजवावे लागत नाही. या तांदळाची किंमत 40 ते 50 रुपये प्रतिकिलो आहे. अर्थात तांदळाची ही प्रजाती अगदीच नवी आहे असे नाही. आसाममध्ये असा तांदूळ बराच प्रचलित आहे. तिथे त्याला ‘जीआय’ टॅगही मिळालेला आहे.

 

Back to top button