कोरोना, ईसीजी, रक्तचाचणी करू शकणारा रोबो

कैरो :
इजिप्तमध्ये असा रोबो तयार करण्यात आला आहे जो कोरोना संक्रमणाची तपासणी करू शकतो. तो तापमान तपासणे व मास्क न परिधान करणार्यांना इशारा देणे, अशी कामेही करू शकतो. ‘कोव्हिड-19’ टेस्टशिवाय हा रोबो इकोकार्डियोग्राम (ईसीजी), रक्तचाचणी आणि एक्स-रे ही कामेही करू शकतो. तपासणीचे परिणाम रोबोच्या छातीवर बसवलेल्या स्क्रीनवर पाहायला मिळू शकतात.
हा रोबो उत्तर कैरोच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये तयार करण्यात आला आहे. त्याचे नाव ‘सिरा-03’ असे आहे. महमूद अल-कौमी यांनी हा रोबो तयार केला आहे. त्यांनी सांगितले, हा रोबो विषाणू संक्रमण रोखण्यासाठी मदत करू शकतो. त्याचा चेहरा आणि हात माणसासारखेच आहेत. त्यामुळे तो ब्लड टेस्ट व ईसीजीही करू शकतो. रुग्ण या रोबोला पाहून घाबरू नयेत यासाठी मी त्याला पूर्णपणे मानवी रूप देण्याचा प्रयत्न केला. आता त्याला पाहून रुग्णांनी दिलेल्या प्रतिसादाने मी खूश आहे. ‘कोव्हिड-19’ टेस्ट करण्यासाठी तो रुग्णाची हनुवटी वर करून स्वॅब तोंडात घालून सॅम्पल घेऊ शकतो. त्याचा वापर बँक, विमानतळ आणि रेल्वेस्थानकांसारख्या गर्दीच्या ठिकाणी करता येऊ शकतो असेही त्यांनी सांगितले.