सारा की करिश्मा? | पुढारी | पुढारी

सारा की करिश्मा? | पुढारी

मुंबई : डेव्हीड धवनने गोविंदाबरोबर अनेक हिट चित्रपट दिले होते. त्यापैकीच एक होता ‘कुली नं. 1’. गोविंदाबरोबर बहुतांशी करिश्मा कपूरची जोडी असायची. यामध्येही या जोडीने धमाल केली होती. आता डेव्हीडने गोविंदाला ओळख दाखवणेही बंद करून मुलगा वरुणबरोबर आपल्याच जुन्या चित्रपटांचे रिमेक बनवण्यास सुरुवात केली आहे. वरुण धवनबरोबर आता त्याने साराची जोडी जमवली आहे. या जोडीचा नवा ‘कुली नं.1’ आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचा ट्रेलरही प्रसिद्ध झाला आहे. वरुण गोविंदाच्या तोडीस तोड काम करतो की नाही हे कळेलच; पण सारा करिश्मापेक्षा सरस कामगिरी करते का हेही दिसून येईल.

वरुण एक चांगला अभिनेता आहे हे त्याने आजपर्यंत अनेक चित्रपटांमधून दाखवले आहे. ‘बदलापूर’सारख्या चित्रपटात त्याने वयापेक्षा मोठी व्यक्तिरेखाही चांगली साकारली होती. गोविंदाप्रमाणेच त्याला नृत्यकौशल्य आणि विनोदाचे अचूक टायमिंग आहे. त्यामुळे गोविंदाच्या चित्रपटांच्या रिमेकमध्ये तो सहज खपून जाऊ शकतो. (अर्थात गोविंदा तो गोविंदाच, त्याला पर्याय नाही!) डेव्हीड आणि गोविंदाच्या चित्रपटांमध्ये नायिकांची भूमिका कचकड्याच्या बाहुल्यांसारखीच असायची, त्यामुळे सारालाही करिश्माने साकारलेली भूमिका करणे ही फारशी कठीण बाब नाही. ‘कुली नं.1’चा ट्रेलर येताच तो एक लाखापेक्षाही अधिक लोकांनी पाहिला. तीन मिनिटे 15 सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये वरुण, सारा आणि साराच्या वडिलांच्या भूमिकेत असलेल्या परेश रावल यांची धमाल पाहायला मिळते. वरुण या चित्रपटात पाच रूपांमध्ये दिसून येतो. जावेद जाफरी, जॉन लिव्हर आणि राजपाल यादव यांच्याही या विनोदपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 25 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Back to top button