तब्बल ५२ कोटी रुपयांची हँडबॅग! | पुढारी

तब्बल ५२ कोटी रुपयांची हँडबॅग!

मिलान : एखाद्या हँडबॅगची किंमत जास्तीत जास्त किती असू शकते असे तुम्हाला वाटते? आपल्या सर्व अंदाजांना हवेत उडवणारी एक हँडबॅग इटलीत आहे. या बॅगेची किंमत तब्बल 52 कोटी रुपये आहे! आता इतके कोटी रुपये या बॅगेत तरी बसू शकतील का असा प्रश्न आपण विचारायचा नाही. ‘बोरीनी मिलानेसी’ या इटालियन लक्झरी ब्रँडने ही हँडबॅग बनवली आहे.

या बॅगेची किंमत इतकी असण्याचे कारणही तसेच आहे. या बॅगेवर व्हाईट गोल्डपासून बनवलेली दहा फुलपाखरे आहेत. तसेच अनेक मौल्यवान हिरे व रत्नांनी ही बॅग सजवलेली आहे. त्यामुळेच तिची किंमत 60 लाख यूरो इतकी आहे. भारतीय चलनात ही रक्कम सुमारे 52 कोटी रुपये होते. बॅगेला इतकी किंमत असण्यामागे एक सामाजिक कारणही आहे. या बॅगेला मिळणार्‍या रकमेपैकी 7 कोटी रुपये हे समुद्रांची स्वच्छता करण्याच्या कामासाठी दिले जाणार आहेत. ब्रँडचे सहसंस्थापक मॅत्तीयो रोडोल्फो मिलानेसी यांनी सांगितले की सध्या समुद्रातही प्लास्टिक कचरा मोठीच समस्या बनला आहे. सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात त्यामध्ये मास्क आणि ग्लोव्हचीही भर पडत आहे. हा कचरा हटवण्यासाठी मोहीम राबवण्यात येणार आहे. त्याचा आर्थिक भार या बॅगेच्या विक्रीतून उचलला जाईल. ही बॅग बनवण्यासाठी एक हजार तास लागले. या बॅगेला समुद्राच्या पाण्यासारखा निळसर रंग देण्यात आलेला आहे.

Back to top button