डायनासोरमध्ये थंड आणि उष्णही रक्त! | पुढारी

डायनासोरमध्ये थंड आणि उष्णही रक्त!

वॉशिंग्टन : पक्ष्यांमध्ये उष्ण रक्त असते आणि सरडे हे उन्हात पहुडून स्वतःला उष्ण ठेवत असतात. या दोन्हीचे गुणधर्म डायनासोरच्या प्रजातींमध्ये होते असे दिसून आले आहे. त्यांच्यामध्ये सरड्यांसारखे थंड रक्ताची चयापचय यंत्रणाही होती व पक्ष्यांसारखे उष्ण रक्ताचीही जटिल यंत्रणा होती, असे पॅलिओंटोलॉजिस्टना दिसून आले आहे.

नेहमीची कार्ये करण्यासाठी एखाद्या जीवाला किती ऊर्जा लागते त्यावर संबंधित जीवाची चयापचय यंत्रणा अवलंबून असते. एखादा प्राणी अधिक सक्रिय असेल तर चयापचय क्रिया आणि ऊर्जाही अधिक असते. मात्र त्यासाठी त्याला पुरेसे अन्न व ऑक्सिजन ग्रहण करावे लागते, जेणेकरून हे चयापचय क्रियेचे ‘इंजिन’ सुरू राहील. या क्रियेत ‘बोनस’ म्हणून उष्णता निर्माण होत असते. असे प्राणी ‘उष्ण रक्ताचे’ म्हणून ओळखले जात असतात. त्याविरुद्ध यंत्रणा असलेले प्राणी थंड रक्ताचे असतात. अशा थंड रक्ताच्या प्राण्यांना कमी अन्न व ऑक्सिजन लागते. मात्र त्यांना आपल्या शरीराचे तापमान योग्य ठेवावे लागत असते. त्यासाठी ते सूर्यप्रकाशावर अवलंबून असतात. अधिक उष्णता असेल तर सावलीचा आश्रय घेतात. डायनासोरचेही दोन प्रकार होते. काही डायनासोर जमिनीवर चालणारे होते तर काही आकाशात उडणारे होते. टायरॅनोसॉरस किंवा टी रेक्स डायनासोरसारखे मांसाहारी डायनासोर हे उष्ण रक्ताचे प्राणी होते. मात्र ट्रायसेरॅटोप्स आणि डक-बिल्ड हॅड्रोसॉरससारखे डायनासोर थंड रक्ताचे बनले.

Back to top button