सूर्यापासून सर्वात दूरवरचा ग्रह! | पुढारी

सूर्यापासून सर्वात दूरवरचा ग्रह!

न्यूयॉर्क ः आपल्या ग्रहमालिकेतील नेपच्यून हा ग्रह सूर्यापासून सर्वाधिक अंतरावर असलेला ग्रह आहे. तसेच तो आपल्या ग्रहमालिकेतील दोन ‘आइस जायंट्स’पैकी एक आहे. या थंड, बर्फाळ आणि निळ्या ग्रहाचे संशोधकांना नेहमीच कुतूहल वाटत आले आहे. पृथ्वीच्या तुलनेत हा ग्रह सूर्यापासून 30 पट अधिक अंतरावर आहे. त्याला सूर्याभोवतीची एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास पृथ्वीच्या हिशेबात तब्बल 165 वर्षे लागतात.

नेपच्यून त्याच्या स्वतःच्या अक्षाभोवती मात्र पृथ्वीच्या तुलनेत अधिक वेगाने फिरतो. त्यामुळे या ग्रहावरील दिवस हा पृथ्वीवरील अवघ्या 16 तासांचाच असतो. सन 1846 मध्ये खगोल शास्त्रज्ञांनी नेपच्यूनचा शोध लावला. खरे तर त्यावेळी ते युरेनस ग्रहाच्या कक्षेचा अभ्यास करीत होते. त्यावेळी त्यांना आढळले की, एक अज्ञात ग्रह युरेनच्या गुरुत्वाकर्षणावर प्रभाव टाकत आहे. नेपच्यून हा ग्रह उघड्या डोळ्यांनी दिसू शकत नाही इतका तो दूर आहे. मात्र, टेलिस्कोपच्या सहाय्याने त्याचा छडा लावण्यात आला व त्याचे निरीक्षण करण्यात आले.

‘नासा’च्या म्हणण्यानुसार, त्याला 1612 मध्येच दुर्बिणीतून पाहण्यात आले होते; पण त्यावेळी तो एक ग्रह आहे याची कल्पना तत्कालीन संशोधकांना नव्हती. ‘व्होएजर-2’ हे एकमेव यान असे आहे की, ज्याने नेपच्यूनला भेट दिली. सन 1989 मध्ये या यानाने नेपच्यूनची छायाचित्रे टिपून ती पृथ्वीवर पाठवली. नेपच्यूनच्या वातावरणात मिथेन वायू असल्याने त्याचा रंग हिरवट निळा दिसतो. हा सूर्यापासूनचा आठवा आणि ग्रहमालिकेतील शेवटचा ग्रह आहे. 2006 मध्ये संशोधकांनी प्लुटोला ग्रह नव्हे तर खुजा ग्रह ठरवले होते.

हेही वाचलंत का?

Back to top button