‘नासा’ने शेअर केले चक्राकार आकाशगंगेचे छायाचित्र | पुढारी

‘नासा’ने शेअर केले चक्राकार आकाशगंगेचे छायाचित्र

वॉशिंग्टन ः काही अवकाशीय द‍ृश्यांची छायाचित्रे ‘नासा’कडून सोशल मीडियातही शेअर केली जात असतात. आता ‘नासा’ने एका चक्राकार (व्हर्लपूल) आकाशगंगेचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केले आहेत. ही छायाचित्रे ‘हबल’ या अंतराळ दुर्बिणीने टिपलेली आहेत.

‘नासा’ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ही छायाचित्रे शेअर केली आहेत. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे ‘राऊंड अँड राऊंड वुई गो’. या आकाशगंगेच्या भुजा सर्पिलाकार असून त्या गोलाकार फिरत आहेत. आकाशगंगेतील तारे निर्मितीचे गुलाबी क्षेत्रही दिसून येते. तसेच तारकापुंजाचे निळे व चमकदार क्षेत्रही दिसते. या आकाशगंगेचे नाव ‘एम 51’ असे आहे. ही आकाशगंगा तारे, वायू आणि धुळीने भरलेली आहे. या आकाशगंगेला ‘व्हर्लपूल गॅलेक्झी’ असेही म्हटले जाते.

या आकाशगंगेतील भुजा म्हणजे तार्‍यांच्या जन्माची ‘नर्सरी’च आहे! तिथे हायड्रोजन वायू मोठ्या प्रमाणात असून नवी तार्‍यांची निर्मिती होत असते. ही आकाशगंगा पृथ्वीपासून तब्बल 31 दशलक्ष प्रकाशवर्ष अंतरावर आहे. आपली ग्रहमालिका ज्या ‘मिल्की वे’ या आकाशगंगेचा एक भाग आहे तशा अनेक आकाशगंगा या ब—ह्मांडात आहेत. ‘हबल’कडून वेळोवेळी अशा आकाशगंगांची छायाचित्रे संशोधकांना मिळत असतात.

Back to top button