‘दोन जिभा’ असलेली महिला! | पुढारी

‘दोन जिभा’ असलेली महिला!

वॉशिंग्टन : टॅटू, बॉडी पिअर्सिंग किंवा शरीरात बदल घडवून आणण्यासाठी भन्‍नाट शस्त्रक्रिया करणारे अनेक लोक जगाच्या पाठीवर आहेत. अशीच एक महिला अमेरिकेत असून तिच्या तोंडात एक नव्हे तर दोन जिभा आहेत! एकाच वेळी दोन ग्लासमधील कोल्ड्रिंकची चव ती घेत असते. अर्थातच तिच्या या दोन जिभा जन्मापासूनच्या नसून तिने आपल्या एकाच जिभेचे शस्त्रक्रिया करून सापाच्या जिभेसारखे पुढील टोकावर दोन भाग करवून घेतलेले आहेत!

ब्रायना मेरी शिहादेह असे या महिलेचे नाव. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील ही महिला एक ड्रेडलॉक कलाकार आहे. तिला आपल्या शरीरामध्ये बदल करण्याची आवड आहे. जिभेच्या टोकाचे दोन भाग करण्यासाठीही तिने पाण्यासारखा पैसा खर्च केलेला आहे. इन्स्टाग्रामवर ती आपल्या या जिभेचे अनेक व्हिडीओ शेअर करीत असते व ते बरेच व्हायरलही होतात.

तिच्या एका व्हिडीओला आतापर्यंत तेरा हजारांपेक्षाही अधिक लोकांनी लाईक केले आहे. दोन कोल्ड्रिंक्सची एकाच वेळी चव घेत असताना ती म्हणते की याबाबत माझा मेंदू ‘कन्फ्यूज’ होतो! दोन ग्लासमध्ये जिभेची दोन वेगळी केलेली टोकं बुडवून त्यांची चव चाखत असलेले तिचे व्हिडीओ पाहून लोक चकीत होतात!

Back to top button