‘पार्कर’ने टिपले शुक्राच्या पृष्ठभागाचे छायाचित्र | पुढारी

‘पार्कर’ने टिपले शुक्राच्या पृष्ठभागाचे छायाचित्र

वॉशिंग्टन : अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या ‘पार्कर सोलर प्रोब’ या अंतराळयानाने शुक्र ग्रहाच्या पृष्ठभागाचे सुस्पष्ट छायाचित्र टिपण्यात यश मिळवले आहे. सर्वसाधारणपणे शुक्राचा पृष्ठभाग पाहायला मिळत नाही. याचे कारण म्हणजे हा ग्रह नेहमी कार्बन डायऑक्साईडच्या ढगांनी आच्छादीत असतो. मात्र, ‘पार्कर’ने आता जे छायाचित्र टिपले आहे ते पृष्ठभागापासून केवळ 7,693 मैल अंतरावरून टिपलेले आहे.

या प्रोबच्या ‘वाईड फिल्ड इमेजर’ (डब्ल्यूआयएसपीआर) ने शुक्राच्या विषुववृत्तावरील ‘अफ्रोडाईट टेरा’ असे नाव दिलेल्या उंच भागाचे सुस्पष्ट छायाचित्र टिपले आहे. पार्कर सोलर प्रोब हे मानवरहीत यान फ्लोरिडाच्या केप कॅनाव्हरल येथून ऑगस्ट 2018 मध्ये सूर्याचे जवळून निरीक्षण करण्यासाठी लाँच करण्यात आले होते. त्यासाठी त्याला शुक्राच्या गुरुत्वाकर्षणाची मदत घ्यावी लागते. गेल्यावर्षी शुक्राभोवती फिरत असताना या यानाने हे छायाचित्र टिपले होते. याबाबतची माहिती आता ‘नासा’च्या संशोधकांनी दिली आहे. त्यांनी सांगितले की शुक्राचा हा विषुववृत्ताजवळील परिसर छायाचित्रात अंधारात असल्यासारखा दिसतो. तेथील तापमान आजुबाजूच्या परिसराच्या तुलनेत कमी आहे. तिथे 85 अंश फॅरेनहाईट इतके तापमान असू शकते. शुक्र हा जणू आगीचाच एक गोळा आहे. त्यामुळे तिथे जीवसृष्टीची सूतराम शक्यता नाही. ‘डब्ल्यूआयएसपीआर’चे प्रोजेक्ट सायंटिस्ट एंजिललोस वॉर्लिडास यांनी सांगितले की हे इमेजर ‘व्हिजिबल लाईट ऑब्झर्व्हेशन’साठी बनवण्यात आले आहे. आम्हाला वाटले होती की यामुळे शुक्रावरील ढग पाहायला मिळतील, तर चक्क त्याचा पृष्ठभागच पाहायला मिळाला. असे वाटते की हा प्रोब इन्फ्रारेड प्रकाशाबाबत अधिक संवेदनशील आहे किंवा त्याला असे ठिकाण मिळाले आहे जेथून ढगांना भेदून शुक्राचा पृष्ठभाग पाहता येऊ शकेल.

Back to top button