चीनच्या नव्या अंतराळ स्थानकावर जाणार अंतराळवीर | पुढारी

चीनच्या नव्या अंतराळ स्थानकावर जाणार अंतराळवीर

बीजिंग : आपल्या नव्या अंतराळ स्थानकावर चीन आता तीन अंतराळवीरांना पाठवणार आहे. हे तीन अंतराळवीर स्थानकावर तीन महिने राहून वेगवेगळे वैज्ञानिक प्रयोग करतील. याबाबतची घोषणा सोमवारी करण्यात आली. शनिवारीच चीनने कार्गो स्पेसक्राफ्ट ‘तियांझू-2’ पाठवले होते.

हे अंतराळयान ‘तियान्हे’ नावाच्या आपल्या नूतन अंतराळ स्थानकावर वेगवेगळी सामग्री आणि उपकरणे घेऊन रवाना करण्यात आले. ‘तियांझू-2’ या मालवाहतूक करणार्‍या यानाचे ‘लाँग मार्च-7  वाय 3’ या रॉकेटच्या सहाय्याने प्रक्षेपण करण्यात आले. हेन प्रांतातील वेंचांग प्रक्षेपण केंद्रावरून ते लाँच करण्यात आले. ‘ग्लोबल टाईम्स’ने दिलेल्या माहितीनुसार हे यान पाठवण्यास काही कारणांमुळे एक महिना विलंब झाला होता. चीनने अंतराळ स्थानकाचे मुख्य मोड्यूल 29 एप्रिलला यशस्वीरीत्या लाँच केले होते. पुढील वर्षीच्या अखेरपर्यंत चीन अंतराळात आपले अंतराळ स्थानक पूर्णपणे विकसित करणार आहे. याच महिन्यात चिनी रोव्हरने मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर उतरण्यात यश मिळवले होते. या ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हरला घेऊन ‘तियानवेन-1’ हे यान 23 जून 2020 मध्ये लाँच करण्यात आले होते.

Back to top button