इलेक्ट्रिक नाकाने 80 सेकंदांतच  कोरोना चाचणी | पुढारी

इलेक्ट्रिक नाकाने 80 सेकंदांतच  कोरोना चाचणी

तेल अवीव : कोरोना संक्रमणाच्या तपासणीसाठी इस्रायलच्या संशोधकांनी आता एक नवे तंत्र विकसित केले आहे. आता अशी चाचणी एका ‘इलेक्ट्रिक नाका’च्या सहाय्याने घेण्यात येईल. रुग्णाला केवळ हे उपकरण नाकाला लावून श्वासोच्छ्वास घ्यावा लागेल. एखाद्या गोष्टीचा वास घेतल्यासारखे करून हे उपकरण दिले की केवळ 80 सेकंदांमध्येच चाचणीचा रिपोर्ट येतो! वैज्ञानिकांचा दावा आहे की या नव्या चाचणीतून 94 टक्के अचूक निदान होते.

इस्रायलच्या विजमॅन इन्स्टिट्यूटमधील वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की हा थ—ीडी प्रिंटेड इलेक्ट्रिक नोज आहे. तो एखाद्या व्यक्तीच्या नाकाला लावला जातो. व्यक्तीच्या नाकातील रसायनाचा गंध तपासल्यानंतर हे इलेक्ट्रिक नोज संबंधित व्यक्ती पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे सांगते. संशोधकांचे म्हणणे आहे की प्रत्येक आजाराचा एक विशिष्ट गंध असतो. तो शरीराच्या चयापचय क्रियेला बदलत असतो. हाच फॉर्म्युला यामध्ये वापरण्यात आला आहे. या इलेक्ट्रिक नाकाला ‘पेन-3’ असे नाव देण्यात आले आहे. ते एका लांब ट्यूबच्या सहाय्याने बनवले आहे. यामधील विशिष्ट सेन्सर नाकातील विषाणूचा छडा लावतात. संशोधक प्रा. नोएम सोबेल यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘पेन-3’ अशा प्रकारे विकसित करण्यात आले आहे की ते नाकातील वोलाटाईल ऑर्गेनिक कंपाऊंडस्ची तपासणी करील. ‘पेन-3’ च्या सहाय्याने 503 लोकांची चाचणी घेण्यात आली. त्यापैकी 27 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. विमानतळ तसेच गर्दीच्या ठिकाणी ही चाचणी उपयुक्त ठरू शकते असे सोबेल यांनी म्हटले आहे.

 

Back to top button