इंडोनेशियात विष्णूची सर्वात मोठी मूर्ती | पुढारी

इंडोनेशियात विष्णूची सर्वात मोठी मूर्ती

जकार्ता ः ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर या त्रयीपैकी विष्णू ही देवता सृष्टीची पालनकर्ती मानली जाते. विष्णूची मंदिरे केवळ भारतातच नव्हे तर प्राचीन बृहदभारताचा भाग असलेल्या अनेक देशांमध्येही आढळतात. त्यामध्येच कंबोडियातील ‘जगातील सर्वात मोठे मंदिर’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या अंकोर वटचाही समावेश होतो. आता इंडोनेशियामध्ये जगातील सर्वात मोठी विष्णू मूर्ती निर्माण करण्यात आलेली आहे. ती 122 फूट उंच आणि 64 फूट रुंदीची आहे. तिच्या निर्मितीसाठी तांबे आणि पितळ या धातूंचा वापर केला आहे. गरूडावर बसलेल्या आणि हातात सुदर्शन चक्र धारण केलेल्या विष्णूची ही भव्य प्रतिमा आहे.

1979 मध्ये इंडोनेशियाचे रहिवासी असलेल्या बप्पा न्यूमन नुआर्ता यांनी अशी विशालकाय विष्णू मूर्ती निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यासाठी एक कंपनी स्थापन करण्यात आली आणि हे अत्यंत कठीण काम 28 वर्षांमध्ये पूर्ण करण्यात आले. न्यूमन नुआर्ता यांनी 1994 मध्ये प्रत्यक्ष मूर्ती घडवण्याचे काम सुरू केले. इंडोनेशियन सरकारनेही या प्रकल्पाला मदत केली. 2018 मध्ये या मूर्तीचे काम पूर्ण झाले. दरम्यानच्या काळात बजेट कमी पडले म्हणून अनेक वेळा या मूर्तीचे काम थांबवावे लागले. एकदा या परिसरातील लोकांनी आक्षेप घेतल्याने काम थांबले. मात्र, ही मूर्ती तयार झाल्यावर ती इंडोनेशियातील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ ठरेल हे पटल्यावर लोकांचा विरोध मावळला आणि काम पुन्हा सुरू झाले. मूर्तीचे काम पूर्ण झाल्यावर सर्वप्रथम इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विदोदो यांनी तिचे दर्शन घेतले आणि त्यानंतर ती सर्वांसाठी खुली करण्यात आली. मलेशियात बाटू गुहेत भगवान कार्तिकेय म्हणजेच मुरुगनचे स्थान आहे. या गुहेकडे जाणार्‍या पायर्‍यांच्या सुरुवातीस मुरुगनचीही भव्य मूर्ती आहे. ही सोनेरी मूर्ती 42.7 मीटर म्हणजेच 140 फूट उंचीची आहे.

Back to top button