चिनी रोव्हरने मंगळावर टिपली सेल्फी | पुढारी | पुढारी

चिनी रोव्हरने मंगळावर टिपली सेल्फी | पुढारी

बीजिंग :

मंगळाचे रहस्य उलगडण्यासाठी जगभरातील संशोधक प्रयत्न करीत आहेत. अमेरिकेने तर मंगळभूमीवर अनेक रोव्हरही पाठवलेली आहेत. चीननेही गेल्याच महिन्यात ‘जुरोंग’ नावाचे आपले रोव्हर यशस्वीरीत्या मंगळभूमीवर उतरवले होते. आता या रोव्हरने मंगळावर आपली एक सेल्फी टिपली आहे. या सेल्फीमधून मंगळाच्या पृष्ठभूमीचीही बरीच माहिती समोर आली आहे.

मंगळावरील धुळीचे वातावरण, खडकाळ जमीन या सेल्फीमधूनही समजून घेता येते. चीनच्या राष्ट्रीय अंतरीक्ष प्रशासनाने (सीएनएसए) ही सेल्फी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये जुरोंग रोव्हर आणि लँडर एका छोट्या चिनी राष्ट्रध्वजासमवेत दिसत आहेत. जुरोंगने लँडिंग प्लॅटफॉर्मपासून सुमारे 33 फुटांवर एक रिमोट कॅमेरा लावला आणि नंतर एक सेल्फी घेतली. मंगळाभोवती तीन महिने प्रदक्षिणा घातल्यावर गेल्याच महिन्यात हे रोव्हर घेऊन गेलेले ‘तियानवेन-1’ हे यान उतरवण्यात आले होते. मंगळावर रोव्हर उतरवणारा चीन हा अमेरिकेनंतर जगातील दुसराच देश ठरला आहे. सहा चाकांचे हे रोव्हर मंगळावरील ‘युटोपिया प्लॅनिटिया’ नावाने ओळखल्या जाणार्‍या भागाचा सर्व्हे करीत आहे. तिथे हे रोव्हर पाणी किंवा बर्फाचे संकेत शोधत आहे. त्यावरून मंगळावर एकेकाळी जीवसृष्टी होती की नाही, हे समजू शकणार आहे.

Back to top button