कार्बन उत्सर्जन उच्चांकी स्तरावर | पुढारी | पुढारी

कार्बन उत्सर्जन उच्चांकी स्तरावर | पुढारी

न्यूयॉर्क : सध्या संपूर्ण जग ‘जलवायू परिवर्तन’ आणि ‘ग्लोबल वॉर्मिंग’च्या दुष्परिणामांनी त्रस्त बनले आहे. जगभरातील पर्यावरणवादी व शास्त्रज्ञ सातत्याने यासंदर्भात इशारा देत आहेत. यावर लागलीच ठोस पावले उचलली नाहीत, तर भविष्यात गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागेल, असे ते सांगत आहेत. गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीमुळे बहुतेक देशांमध्ये लॉकडाऊन आहे. असे असले तरी कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. या उत्सर्जनाने आधुनिक काळातील नवा विक्रम नोंदविला आहे. एवढेच नव्हे, तर सध्या या कार्बनच्या उत्सर्जनाचे प्रमाण हे गेल्या 40 लाख वर्षांतील सर्वात जास्त आहे.

अमेरिकेतील ‘नॅशनल ओसियानिक अँड अ‍ॅटमोस्फेअरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ (नोआ) ने यासंबंधीचे संशोधन केले आहे. या संशोधनामध्ये 2021 मधील कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन आजपर्यंतचे सर्वाधिक असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. ‘नोआ’च्या ‘ग्लोबल मॉनिटरिंग लॅबोरेटरी’चे सीनिअर जलवायू शास्त्रज्ञ पीटर टॅन्स यांनी सांगितले की, सध्या प्रत्येक वर्षाला आपण सुमारे 40 अब्ज मेट्रिक टन कार्बन डायऑक्साईड  वातावरणात मिसळवत आहोत.

पीटर टॅन्स यांनी सांगितले की, जर आम्हाला जलवायू परिवर्तनामुळे होणार्‍या भयावह विनाशाला रोखावयाचे असेल, तर कार्बनचे उत्सर्जन शून्यावर आणण्यासाठी प्राधान्याने काम करावे लागेल. याच समस्येने पृथ्वीवरील तापमान सातत्याने वाढत आहे. यामुळे समुद्राच्या वाढणार्‍या पातळीमुळे भविष्यात कोट्यवधी लोकांना विस्थापित व्हावे लागणार आहे. तर उर्वरित लोकांना घातक उष्णतेचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Back to top button