आता डास फैलावू शकणार नाहीत डेंग्यू ! | पुढारी

आता डास फैलावू शकणार नाहीत डेंग्यू !

जकार्ता ः दरवर्षी शेकडो लोकांचा डेंग्यूमुळे मृत्यू होत असतो. डेंग्यूचा फैलाव डासांमुळेच होत असतो. आता यावर संशोधकांनी एक उपाय शोधला आहे. त्याच्या ‘ग्राऊंडब—ेकिंग ट्रायल’मध्ये डेंग्यूची प्रकरणे 77 टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून आले. ही किमया घडली डेंग्यूचा फैलाव करणार्‍या मादी डासांच्या शरीरात सोडलेल्या एका जीवाणूमुळे!

इंडोनेशियाच्या योग्यकार्ता शहरात हा प्रयोग करण्यात आला. वर्ल्ड मॉस्किटो प्रोग्राम टीमचे म्हणणे आहे की, अशा पद्धतीने जगभरातून डेंग्यूला आळा घालता येऊ शकतो. संशोधकांनी यासाठी डासांना एका विशिष्ट ‘व्हॅक्टेरिया’ने संक्रमित केले. ज्या डासांमुळे डेंग्यूचा फैलाव होतो त्यांना या ‘वॉलबाचिया’ नावाच्या जीवाणूने संक्रमित करण्यात आले. याबाबतची माहिती डॉ. केट एंडर्स यांनी दिली. त्यांनी सांगितले, हा बॅक्टेरिया डासाच्या शरीराच्या अशा भागात राहतो जिथे डेंग्यूचे विषाणूही राहतात. त्यामुळे विषाणूला आपली प्रतिरूपे निर्माण करणे कठीण होते. त्यामुळे ते एखाद्या व्यक्‍तीच्या शरीरात आपली प्रतिरूपे सोडू शकत नाहीत. त्यामुळे असे डास चावल्यानंतर व्यक्‍तीला डेंग्यूचे संक्रमण होत नाही. 

यामुळे डेंग्यूची प्रकरणे 77 टक्के कमी झाली तसेच 86 टक्के लोकांना हॉस्पिटलमध्ये जावे लागले नाही. सुमारे 50 वर्षांपूर्वी अतिशय कमी लोकांनी डेंग्यूचे नाव ऐकले असेल. मात्र, सध्या या डेंग्यूच्या विषाणूनेही जगभरात आपली दहशत माजवलेली आहे. 1970 मध्ये केवळ नऊ देशांपुरताच डेंग्यू मर्यादित होता. आता दरवर्षी जगभरातून सुमारे 40 कोटी संक्रमणाची प्रकरणे समोर येतात.

Back to top button