ऑक्टोपस कसे बदलतात रंग? | पुढारी

ऑक्टोपस कसे बदलतात रंग?

न्यूयॉर्क : सरडे रंग बदलतात हे आपण नेहमीच बघतो. विशेषतः शॅमेलिऑनसारख्या सरड्यांचे हे कसब अफलातूनच असते. मात्र निसर्गात अन्यही अनेक जीव असे रंग बदलणारे आहेत. त्यामध्येच ऑक्टोपसचा समावेश होतो. या जलचराची अनेक अनोखी वैशिष्ट्ये असतात.

त्याच्या पुन्हा उगवू शकणार्‍या आठ भुजा, तीन हृदये, तांबे धातूचे मोठे प्रमाण असणारे निळे रक्त, डोनटसारख्या आकाराचा मेंदू ही त्याची काही ठळक वैशिष्ट्ये. मात्र त्याहीपेक्षा त्यांचे चटकन दिसून येणारे वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत वेगाने रंग बदलण्याचे व आजूबाजूच्या परिस्थितीत बेमालूम मिसळून जाण्याचे कौशल्य. ऑक्टोपसची ही रंग बदलण्याची क्षमता अनेक वर्षांपासून संशोधनाचा विषय बनलेली आहे.

सागरी अपृष्ठवंशीय प्राण्यांच्या ‘सेफॅलोपोड्स’ या कुळाचे ‘कॅमौफ्लेज’ म्हणजेच हव्या त्या वेळी वेगाने रंग बदलणे हे ठळक वैशिष्ट्य आहे. या कुळातच स्क्वीड आणि कटलफिशचाही समावेश होतो. मात्र ऑक्टोपसमध्ये हे कसब अधिक प्रमाणात दिसून येत असते. क्षणार्धात कोणत्याही रंगाची छटा धारण करण्याचे ऑक्टोपसचे वैशिष्ट्य अन्य प्राण्यांमध्ये आढळत नाही. ऑक्टोपसच्या सुमारे 300 प्रजाती आहेत.

यापैकी प्रत्येक प्रजातीमध्ये रंग बदलण्याची क्षमता असते असे नाही. मात्र अनेक प्रजाती विविध रंगछटा अत्यंत कमी वेळेत धारण करू शकतात. त्यांच्या या क्षमतेकडे माणसाचे प्राचीन काळापासूनच लक्ष गेलेले आहे. सुमारे 2400 वर्षांपूर्वी ग्रीक तत्त्वज्ञ अ‍ॅरिस्टॉटलने ऑक्टोपसच्या या क्षमतेबाबत विस्ताराने लिहिले आहे. अ‍ॅरिस्टॉटललाच अनेक लोक आधुनिक विज्ञानाचा जनक मानतात. ऑक्टोपसच्या रंग बदलण्याच्या क्षमतेबाबत लिहिणारा हा पहिलाच माणूस.

मॅसाच्युसेटस्मधील नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटीच्या बायोकेमिस्ट लैला डेरावी यांनी सांगितले की, गेल्या अनेक शतकांच्या काळात ऑक्टोपसच्या या क्षमतेबाबतच्या माहितीत फारशी भर पडलेली नाही. त्यांच्यामधील ही क्षमता अत्यंत जटिल अशी असते. वेगवेगळ्या सूक्ष्म अशा घटकांच्या सहाय्याने ही प्रक्रिया घडत असल्याने त्याबाबत फारसे संशोधन झालेले नाही व ही क्रिया नेमकी कशी घडते हे सांगणे जवळजवळ अशक्यच आहे!

Back to top button