केवळ छातीत दुखणे हेच हार्ट अ‍ॅटॅकचे नाही लक्षण | पुढारी

केवळ छातीत दुखणे हेच हार्ट अ‍ॅटॅकचे नाही लक्षण

लंडन : बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकार आणि हार्ट अ‍ॅटॅकचे प्रमाणही वाढले आहे. मात्र लोकांना याबाबत अनेक प्रकारचे गैरसमज असतात. हार्ट अ‍ॅटॅकचे लक्षण म्हणजे छातीत दुखणे इतकेच लोकांना माहिती आहे. मात्र प्रत्येक हार्ट अ‍ॅटॅकवेळी छातीत दुखतेच असे नाही. एका रिपोर्टनुसार छातीत दुखणे हेच केवळ हार्ट अ‍ॅटॅकचे लक्षण होत नाही.

निरनिराळ्या व्यक्तींमध्ये त्याची लक्षणे निरनिराळी असू शकतात. इतकेच नव्हे तर पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हार्ट अ‍ॅटॅकची लक्षणे वेगळी दिसू शकतात. अनेक वेळा डॉक्टरांनाही ही लक्षणे चटकन ओळखता येत नाहीत, हे विशेष!

अनेक संशोधनांमधून असे दिसून आले आहे की, अनेक महिला हृदयविकाराच्या झटक्याचे संकेत मिळत असतानाही त्याकडे दुर्लक्ष करतात. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हार्ट अ‍ॅटॅकची लक्षणे सौम्य असतात. त्यामुळे महिलांना त्याचे गांभीर्य समजत नाही व त्या मदत घेण्यास पुढे येत नाहीत. एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की छातीत दुखणे, बेचैनी ही हार्ट अ‍ॅटॅकची काही सामान्य लक्षणे असली तरी महिलांमध्ये अशीही लक्षणे दिसतात, जी हृदयाशी संबंधित जोडता येत नाहीत.

काही महिलांना हार्ट अ‍ॅटॅकच्या आधी श्वासोच्छ्वास करण्यात अडचण, थकवा, जबडा आणि पाठीत वेदना, अस्वस्थपणा अशी लक्षणे दिसतात. अशा वेळी ज्या महिलांच्या छातीत वेदना होत नाहीत, त्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात व हे घातक ठरू शकते. एका संशोधनात असे दिसून आले की, हार्ट अ‍ॅटॅकवेळी 36 टक्के पुरुषांच्या छातीत वेदना झाल्या तर 63 टक्के महिलांच्या छातीत वेदना झाल्या नाहीत. त्यामुळे हार्ट अ‍ॅटॅकचे ‘छातीत वेदना’ हेच एकमेव लक्षण आहे असे समजू नये!

Back to top button