मोबाईलचा अतिवापर केल्यास अल्झायमर्सचा धोका | पुढारी

मोबाईलचा अतिवापर केल्यास अल्झायमर्सचा धोका

वॉशिंग्टन : उतारवयात होणार्‍या मेंदूच्या असाध्य आजारांमध्ये अल्झायमर्सचा समावेश होतो. विस्मरणाशी संबंधित या आजाराने जगात अनेक लोक ग्रस्त आहेत. आता या आजाराचे एक कारण मोबाईलही बनू शकते, असे संशोधकांनी म्हटले आहे. ‘करंट अल्झायमर’ या रिसर्च जर्नलमध्ये याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार सेल फोन रेडिएशनमुळे मेंदूतील पेशींमध्ये कॅल्शियमचा स्तर वाढतो व तोच अल्झायमरला कारणीभूत होतो.

या संशोधनात वैज्ञानिकांनी अल्झायमरशी निगडित अनेक संशोधनांचा आढावा घेतला आहे. त्यांना आढळले की, सेलफोनच्या अतिवापराने इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स (विद्युतचुंबकीय ऊर्जा) निर्माण होते व त्याचा विपरीत परिणाम मेंदूवर होतो. संशोधकांचे म्हणणे आहे की, वायरलेस कम्युनिकेशन सिग्नल्स विशेषतः मेंदूतील व्होल्टेज गेटेड कॅल्शियम चॅनेल्सला सक्रिय करतात. त्यामुळे कॅल्शियमचे प्रमाण वाढते. मेंदूत कॅल्शियमचा स्तर एकदमच वाढल्यावर अल्झायमरची स्टेजही लवकर येते. प्राण्यांवरील संशोधनात असे दिसले की, पेशींमध्ये कॅल्शियम साचल्यामुळे अल्झायमरचा अकालीच धोका संभवू शकतो.

अल्झायमर हा डिमेन्शिया या विस्मरणाशी संबंधित आजाराचा एक सर्वसामान्यपणे आढळणारा प्रकार आहे. सध्या तीस ते चाळीस वर्षांचे तरुणही या आजाराच्या विळख्यात अडकत असल्याचे दिसून आले आहे. तासन्तास मोबाईल आणि वायफाय रेडिएशनच्या सान्निध्यात राहिल्याचा हा परिणाम आहे. त्याला आता ‘डिजिटल डिमेन्शिया’ असेही म्हटले जाऊ लागले आहे.

Back to top button