पृथ्वी करते आहे दुपटीने अधिक उष्णतेचा सामना | पुढारी

पृथ्वी करते आहे दुपटीने अधिक उष्णतेचा सामना

वॉशिंग्टन : अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने म्हटले आहे की पृथ्वी 2005 च्या तुलनेत दुपटीने अधिक उष्णतेचा सामना करीत आहे. ‘नासा’ आणि ‘नॅशनल ओशनिक अँड अ‍ॅटमॉस्फिरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’च्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की ऊर्जेचे असंतुलन 2005 पासून 2019 पर्यंत दुप्पटीने वाढले आहे. ही वाढ चिंताजनक असल्याचेही रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

सूर्याच्या किरणोत्सारी ऊर्जेला पृथ्वीचे वातावरण आणि पष्ठभाग किती आपल्यामध्ये सामावून घेते आणि त्याच्या तुलनेत किती ‘थर्मल इन्फ्रारेड रेडिएशन’ अंतराळात परत जाते याचा अभ्यास ‘ऊर्जेचे असंतुलन’ ठरवण्यासाठी केला जातो. ‘नासा’ने म्हटले आहे की ऊर्जेचे असंतुलन वाढण्याचा अर्थ पृथ्वीवर ऊर्जा वाढत असून ती अधिकाधिक गरम होत आहे. या संशोधनाला उपग्रह व समुद्रांमधून मिळालेल्या आकडेवारीचा आधार आहे. ती पृथ्वीवर येणारी ऊर्जा आणि तेथून निघणारी ऊर्जा यांची निगराणी करून दर्शवलेली असते. पृथ्वीची 90 टक्क्यांहून अधिक ऊर्जा समुद्रांमध्ये जाते. त्यामुळे सॅटेलाईट सेन्सर डेटा समुद्राच्या तापमानाची अचूक आकडेवारी देतो. या आकड्यांमध्ये आता जे बदल दिसून येत आहेत ते चिंताजनक आहेत. कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईडसारख्या ‘ग्रीनहाऊस गॅसेस’मुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे. हे वायू एखाद्या ग्रीनहाऊसप्रमाणे पृथ्वीभोवती स्थिती निर्माण करतात व त्यामुळे सूर्याची उष्णता आत कोंडून राहते आणि पृथ्वीचे तापमान वाढते. सूर्यापासून आलेले रेडिएशन इथेच अडकून राहते व अंतराळात परत जात नाही. त्यामुळे पृथ्वीला धोका निर्माण होत आहे.

Back to top button