कोरोना काळातील अभिनव प्रेक्षागृह | पुढारी | पुढारी

कोरोना काळातील अभिनव प्रेक्षागृह | पुढारी

टोकियो ः कोरोना महामारीच्या सध्याच्या काळात सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व काय आहे हे दुनिया जाणते. अशा स्थितीत प्रेक्षागृहात (ऑडिटोरियम) बसून एखादा कार्यक्रम पाहणे ही गोष्टच असंभवनीय वाटते. जपानच्या अकिता शहरात यावर उपाय शोधण्यात आला. तिथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून लोकांना कार्यक्रमाचा आनंद घेता येण्यासारखे खास प्रेक्षागृह बनवण्यात आले. तिथे बसून प्रेक्षकांनी नृत्याचा आनंद घेतला.

अकितामध्ये नुकताच इंटरनॅशनल डान्स फेस्टिव्हल ‘ओडुरू अकिता’चे आयोजन करण्यात आले. त्यासाठी एका मोठ्या थिएटरमध्ये काही सुधारणा करण्यात आल्या. नव्या स्थितीनुसार तिथे एक गोलाकार ऑडिटोरियम बनवण्यात आले. त्याच्या सर्व बाजूंनी तीस क्यूबिकल बनवले गेले. तिथे डोळ्यांच्या उंचीवर छोट्या पट्टीच्या आकाराची छिद्रे बनवण्यात आली. या क्यूबिकल्समध्ये खुर्चीवर बसून लोकांनी छिद्रांमधून पाहत नृत्य महोत्सवाचा आनंद घेतला. 50 वर्षीय आयोजक शिंतारो तनाका यांनी सांगितले की महामारीमुळे मर्यादित प्रेक्षकांनाच प्रवेश देण्यात आला. शो टाईमही 40 मिनिटांचाच होता. एका शोमध्ये तीस प्रेक्षकांना प्रवेश मिळाला. त्यांनी या क्यूबिकल्समध्ये बसून सुरक्षितपणे नृत्याचा आनंद घेतला.

Back to top button