अमेरिका बनवणार ‘कोव्हिड-१९’ वरील औषधाच्या गोळ्या ! | पुढारी

अमेरिका बनवणार ‘कोव्हिड-१९’ वरील औषधाच्या गोळ्या !

वॉशिंग्टन ः अमेरिका सरकारने ‘कोव्हिड-19’ ची लस बनवण्यासाठी औषध कंपन्यांना 18 अब्ज डॉलर्स दिले होते. आता अमेरिकेकडे पाच लसी उपलब्ध आहेत. या लसीही विक्रमी वेळेत बनलेल्या आहेत. याच धर्तीवर आता अमेरिकन संशोधक ‘कोव्हिड-19’ पिल्स म्हणजेच टॅबलेटस् बनवण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी बायडेन सरकारने तीन अब्ज डॉलर्सचा निधी दिला आहे.

या पिल्स म्हणजेच औषधांच्या गोळ्या सुरुवातीच्या टप्प्यातच कोरोना विषाणूचा प्रभाव नष्ट करून टाकतील. त्यामुळे लाखो लोकांचा जीव वाचू शकेल. ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड ह्यूमन सर्व्हिसने हा ‘कोव्हिड-19’ पिल प्रोग्रॅम जाहीर केला आहे. काही कंपन्या तर या गोळ्यांच्या चाचण्या लवकर घेण्यासाठीची तयारीही करीत आहेत. जर सर्व काही सुरळीत झाले तर यावर्षीच्या अखेरपर्यंत कोरोनावरील या गोळ्या बाजारात येऊ शकतील. विशेष म्हणजे या संशोधनात केवळ कोरोनाच नव्हे तर निकटच्या भविष्यात माणसासमोर येऊ शकणार्‍या संभाव्य आरोग्यविषयक धोक्यांचाही विचार करण्यात आला आहे. त्यासाठी ‘अँटिव्हायरल प्रोग्रॅम फॉर पॅन्डेमिक’ चालवला जात आहे. या प्रोग्रॅमच्या अंतर्गत एन्फ्लुएंझा, एचआयव्ही आणि हिपेटायटिसवरील गोळ्याही तयार केल्या जातील. ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅलर्जी अँड इन्फेक्शियस डिसिजेस’चे संचालक डॉ. अँथनी फॉसी यांनी सांगितले की ‘कोव्हिड-19’ च्या रुग्णांवरील उपचार अँटिव्हायरल पिल्सच्या सहाय्याने करण्याची वेळ लवकरच येईल!

Back to top button