जगातील पहिली फ्लाईंग रेस कार | पुढारी

जगातील पहिली फ्लाईंग रेस कार

सिडनी : सध्या जगभरात इलेक्ट्रिक वाहनांचा दबदबा वाढत आहे. अशी सेल्फ-ड्राईव्ह वाहनेही येऊ लागली आहेत हे विशेष. आता जगातील पहिली इलेक्ट्रिक फ्लाईंग रेस कारही तयार झाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या अलौडा एअरोनॉटिक्स या कंपनीने ही कार विकसित केली आहे. ही फ्लाईंग रेस कार रेस ट्रॅकवर वेगाने धावण्याबरोबरच आकाशातही उड्डाण करू शकते.  अलीकडेच कंपनीने दक्षिण ऑस्ट्रेलियात या ‘अलौडा एमके 3’ फ्लाईंग कारची चाचणी घेतली. पुढील वर्षी आयोजित केलेल्या ‘एअरस्पीडर ईएक्सए सीरीज’मध्ये ही कार सहभागी होऊ शकते. या स्पर्धेत मोटारस्पोर्टसला जमिनीवरून आकाशात नेले जाईल. 2021 च्या अखेरीस अशा इलेक्ट्रिक फ्लाईंग रेसचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या ‘अलौडा एमके 3’ कारला दूरवरूनच एका सिम्युलेटरच्या सहाय्याने नियंत्रित केले जाते. एखादी व्यक्‍ती एमके3 च्या कॉकपिटमध्येच बसलेली आहे आणि ती स्वतःच कार उडवत आहे अशा पद्धतीचे वातावरण हे सिम्युलेटर निर्माण करते. ‘अलौडा एमके 3’ या फ्लाईंग कारचे डिझाईन 1950 आणि 1960 च्या दशकातील रेसिंग कारने प्रेरीत आहे. तिचे वजन केवळ 130 किलो असून ती 80 किलोचा भार उचलू शकते. ही कार पूर्णपणे विजेने चालणारी आहे. तिच्यामधील इलेक्ट्रिक मोटार 429 हॉर्सपॉवर ऊर्जा निर्माण करते. ही कार शुन्यापासून ताशी शंभर किलोमीटरचा वेग केवळ 2.8 सेकंदांमध्ये घेते. ती आकाशात 1640 फूट उंचीपर्यंत उडू शकते.

 

Back to top button