प्राचीन कोरोना महामारीचे आढळले डीएनए अवशेष | पुढारी

प्राचीन कोरोना महामारीचे आढळले डीएनए अवशेष

कॅनबेरा : 

सध्या जगभर हाहाकार माजवत असलेला ‘सार्स-कोव्ह-2’ हा विषाणू ज्या कोरोना कुळातील आहे त्यामधील कोरोना विषाणूंनी वीस हजार वर्षांपूर्वीही पूर्व आशियात कहर केला होता. या विषाणूचे अवशेष आधुनिक चीन, जपान आणि व्हिएतनाममधील लोकांच्या डीएनएमध्ये सापडले आहेत. 

ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीच्या यासिने सोईल्मी आणि रे टॉबलर यांनी याबाबतची माहिती दिली. ही माहिती ‘करंट बायोलॉजी’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या संशोधकांनी म्हटले आहे की, संशोधनात आधुनिक लोकसंख्येच्या 42 जनुकांमध्ये विषाणूच्या कोरोना कुळातील अनुवांशिक अनुकूलनाचे पुरावे मिळाले. सध्या कोरोना विषाणूंच्या कुळातील ‘सार्स-कोव्ह-2’ या नव्या विषाणूने जगभरात 38 लाखांपेक्षा अधिक लोकांचा बळी घेतला आहे.

या महामारीमुळे संपूर्ण जगात अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाले आहे. कोरोना कुळातीलच सार्स आणि मर्स विषाणूंमुळे गेल्या वीस वर्षांच्या काळात घातक संक्रमणे झालेली आहेत. ऐतिहासिक विषाणू संसर्गांच्या अनुवांशिक अवशेषांचा छडा लावल्यामुळे आपल्याला भविष्यातील महामारीवरील उपाय शोधण्यासाठी मदत मिळू शकते, असेही या संशोधकांनी म्हटले आहे. अशा विषाणूंशी सामना करण्यासाठी शरीरात काही अनुकूल बदल घडतात व त्याच्या खुणा पिढ्यान्पिढ्या कायम राहतात.

Back to top button