मानवी शरीरात माकडाच्या यकृताचे झाले होते प्रत्यारोपण ! | पुढारी

मानवी शरीरात माकडाच्या यकृताचे झाले होते प्रत्यारोपण !

वॉशिंग्टन ः अवयव प्रत्यारोपण ही काही आता नवलाईची बाब राहिलेली नाही. मात्र, अन्य प्राण्यांच्या शरीरातील अवयवाचे मानवी शरीरात प्रत्यारोपण होणे हे नेहमीच चर्चेचा विषय बनते. अमेरिकेतील 34 वर्षांच्या थॉमस (नाव बदललेले आहे) या व्यक्‍तीवर चक्‍क लंगुर माकडाच्या शरीरातील यकृताचे प्रत्यारोपण करण्यात आले होते. 1992 मधील ही घटना आहे. या प्रत्यारोपणानंतर हा माणूस 70 दिवस जिवंत राहिला होता.

थॉमसचे यकृत नीट काम करीत नव्हते. यकृताच्या आतील भागात रक्‍तस्राव होत होता. ज्यावेळी त्याच्या यकृताची तपासणी करण्यात आली त्यावेळी आढळले की, त्याला ‘हेपेटायटिस बी’ आणि एड्स असे दोन्हीही आहेत. याचदरम्यान थॉमसचा एक अपघात झाला आणि त्यामध्ये त्याची प्लीहा ग्रंथीही दुखापतग्रस्त झाली. ही ग्रंथी काढण्यात आली. त्यानंतर थॉमसला डॉक्टरांनी यकृत प्रत्यारोपणाचा सल्‍ला दिला. थॉमसला अनेक आजार असल्याने कुणीही त्याच्यावर यकृत प्रत्यारोपण करण्यास तयार झाले नाही. हे सर्व घडले 1989 मध्ये. त्यानंतर थॉमस जानेवारी 1992 मध्ये पिटस्बर्गमध्ये आला. कावीळ, यकृताची समस्या, एड्समुळे त्याची स्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली होती. अखेर छायाचित्रात दिसणारे डॉ. थॉमस स्टार्जल आपले एक सहकारी डॉ. जॉन फंग यांच्या सहाय्याने त्याच्यावर यकृत प्रत्यारोपण करण्यास राजी झाले. हे दोन्ही डॉक्टर त्यावेळी अमेरिकेत अवयव प्रत्यारोपणासाठी प्रसिद्ध होते. दोघांनी ठरवले की, थॉमसच्या शरीरात लंगुरचे यकृत प्रत्यारोपित करायचे. त्यावेळी असे मानले जात असे की, लंगुरच्या यकृतावर एचआयव्ही या एड्सच्या विषाणूचा परिणाम होत नाही. तसेच वेगवेगळ्या मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये लंगुरच्या यकृत प्रत्यारोपणाबाबत संशोधनेही सुरू होती. टेक्सासच्या साऊथवेस्ट फाऊंडेशन फॉर रिसर्च अँड एज्युकेशनमधून पंधरा वर्षांचे एक लंगुर माकड आणण्यात आले. त्याचा आणि थॉमसचा रक्‍तगटही एकच होता. डॉक्टरांनी अतिशय गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर 28 जून 1992 या दिवशी थॉमसच्या शरीरात या लंगुरच्या यकृताचे यशस्वी प्रत्यारोपण केले. पाच दिवसांनी थॉमसला खाऊ घालणे आणि चालवणे सुरू केले. तीन आठवड्यांनंतर यकृताचे वजनही वाढले आणि ते सामान्यपणे कार्य करू लागले. सुमारे एक महिन्यानंतर थॉमसला हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले. या वेळेपर्यंत ही शस्त्रक्रिया यशस्वीच ठरलेली होती. संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात हे एक मोठे यश मानले गेले. अर्थात, प्राण्यांच्या अवयवाचे हे काही मानवामधील पहिलेच प्रत्यारोपण नव्हते. त्यापूर्वी डुक्‍कर आणि लंगुरच्या अवयवांचे माणसांत प्रत्यारोपण झाले होते; पण बहुतांशी रुग्णांचा प्रत्यारोपणानंतर एका महिन्यातच मृत्यू झाला होता. थॉमस घरी आल्यावर 21 दिवसांनंतरच त्याच्या संपूर्ण शरीरात संक्रमण फैलावले व त्याच्या मूत्रपिंडांनी काम करणे बंद केले. त्याला पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करून डायलिसिस सुरू करण्यात आले. हळूहळू संक्रमण वाढतच गेले आणि प्रत्यारोपणाच्या 70 दिवसांनंतर थॉमसचा ब—ेन हॅमरेजने मृत्यू झाला!

Back to top button