सतरा वर्षांच्या मुलाने बनवला रोबोटिक आर्म | पुढारी

सतरा वर्षांच्या मुलाने बनवला रोबोटिक आर्म

वॉशिंग्टन : अमेरिकेतील सतरा वर्षांच्या एका मुलाने मेंदूच्या इशार्‍यावर चालणारा रोबोटिक आर्म विकसित केला आहे. बेंजामिन चोई नावाच्या या मुलाने बनवलेला हा रोबोटिक आर्म तुलनेने स्वस्तही आहे हे विशेष.

हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असलेल्या बेंजामिनला रोबोटिक आर्म बनवण्याची कल्पना ‘60 मिनिटस्’ हा अमेरिकन टीव्ही प्रोग्रॅम पाहून सूचली. या कार्यक्रमातील एका एपिसोडमध्ये दाखवले होते की संशोधक एका रुग्णाच्या मेंदूत छोटा सेन्सर बसवतात. त्यामुळे रुग्ण रोबोटिक आर्मला आपल्या मेंदूनेच नियंत्रित करू शकतो.

‘स्मिथसोनिएन’ नावाच्या नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत बेंजामिनने सांगितले की या तंत्रज्ञानाने तो बराच प्रभावित झाला होता. मात्र, असे करणे थोडे धोकादायकही होते याचे कारण म्हणजे त्यासाठी ओपन ब्रेन सर्जरीची आवश्यकता होती. बेंजामिनला आपल्या शिक्षणादरम्यानच रोबो बनवण्याचा व कोडिंग करण्याचा अनुभव होता. त्याने रोबोटिक आर्मला छोट्या तुकड्यांमध्ये प्रिंट करण्यासाठी आपल्या बहिणीच्या थ्री-डी प्रिंटरचा तसेच मासे पकडण्याच्या लाईनचा वापर केला. त्यानंतर या सर्व भागांना जोडून हा आर्म बनवला.

हा आर्म मजबूत आणि टिकाऊ बनवण्यासाठी इंजिनिअरिंग-ग्रेडच्या साहित्यापासून बनवला आहे. तो चार टन वजनाचा भारही उचलू शकतो. हा रोबोटिक आर्म आर्टिफिशियल इंटेलिजन्स अ‍ॅल्गोरिदमच्या उपयोगाने वापरकर्त्याच्या लहरींना ‘इंटरप्रेट’ करू शकतो. त्यामध्ये वापरलेल्या ‘इलेक्ट्रोएन्सेफलोग्राफी’ तंत्राच्या माध्यमातून तो मेंदूच्या इलेक्ट्रिकल अ‍ॅक्टिव्हिटी रेकॉर्ड करू शकतो.

Back to top button