भीतीदायक स्वप्नं का पडतात? | पुढारी

भीतीदायक स्वप्नं का पडतात?

नवी दिल्ली : स्वप्नांविषयी आपल्याकडे अगदी प्राचीन काळापासूनच सूक्ष्म विचार केला गेला आहे. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती (स्वप्नरहित गाढ झोप) या तीन अवस्थांविषयीची माहिती मांडुक्य उपनिषदांसारख्या अनेक उपनिषदांमध्ये आहे. प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी स्वप्नं ही पडतातच. त्यापैकी काही सुखावह असतात तर काही भयावहही असतात. अशा भीतीदायक स्वप्नांची अनेकांना जागेपणेही भीती वाटत असते. ही भीतीदायक स्वप्नं का पडतात याचा कधी आपण विचार केला आहे का?

ज्या स्वप्नांमुळे भीती वाटते त्यांना इंग्रजीत ‘नाईटमेअर’ असे म्हटले जाते. अशी स्वप्नं पडणं हे आपल्या भावना आणि आठवणींना सामोरे जाण्यासाठी मेंदूचा एक प्रतिसाद असू शकतो असे तज्ज्ञांना वाटते. व्यक्तीच्या दबलेल्या इच्छा आणि काही गोष्टी स्वप्नांच्या माध्यमातून व्यक्त होतात. अनेकदा लोकांच्या मनात विविध गोष्टींविषयी चिंता असते. या चिंता आणि ताणतणावामुळे भीतीदायक स्वप्नं पडण्याची शक्यता असते. पोस्ट ट्रॉमेटिक स्ट्रेस डिसऑर्डर आणि नाईटमेअर डिसऑर्डर यामुळेही भीतीदायक स्वप्नं पडू शकतात. आपल्या झोपेचे अनेक टप्पे असतात. ज्यामध्ये रॅपिड आय मुव्हमेंट हा एक टप्पा असतो.

या टप्प्यामध्ये व्यक्ती स्वप्नं पाहण्याची अधिक शक्यता असते. एका सिद्धांतानुसार झोपेतही आपला मेंदू सक्रिय असतो. मात्र, त्यावेळी त्याच्या लॉजिकल सेंटरऐवजी इमोशनल सेंटर अधिक कार्यरत असतात. त्यामुळे जीवनातील ज्या भावनात्मक विचारांवर आणि परिस्थितीवर आपण झोपेत नसताना लक्ष देत नाही, त्या विचारांशी आणि परिस्थितीशी संबंधित स्वप्नं आपल्याला पडतात.

Back to top button