तेरा वर्षांच्या मुलाने घेतली भौतिकशास्त्राची पदवी | पुढारी

तेरा वर्षांच्या मुलाने घेतली भौतिकशास्त्राची पदवी

न्यूयॉर्क : बुद्धिमत्ता, प्रतिभा या गोष्टी वयाने मोजल्या जाऊ शकत नाहीत. आद्य शंकराचार्यांनी अतिशय लहान वयातच आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेने सर्वांना थक्क केले होते. आधुनिक जगातही अनेक मुलं लहान वयातच मोठी कामगिरी करून दाखवत असतात. आता अमेरिकेतील अवघ्या तेरा वर्षांच्या इलियट टॅनर या मुलाने मिनेसोटा युनिव्हर्सिटीतून भौतिकशास्त्राची पदवी संपादन करून सर्वांना थक्क केले आहे.

इलियटने सांगितले की हा एक अतिशय सुखद अनुभव होता. अर्थात तो काही अमेरिकेच्या इतिहासातील विद्यापीठाची पदवी संपादन करणारा सर्वात लहान वयाचा मुलगा नाही. हा किताब मायकल किर्ने याच्याकडे आहे. त्याने वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षीच 1992 मध्ये साऊथ अलाबामा युनिव्हर्सिटीतून अँथ्रोपोलॉजी विषयातील पदवी संपादन केली होती. अर्थात इलियटचे आई-वडील त्याच्या कामगिरीने प्रचंड खुश आहेत. आपल्या लाडक्या लेकाचा अर्थातच त्यांना अभिमान वाटतो. विशेषतः त्याने घेतलेली मेहनत आणि त्याची समर्पित वृत्ती त्यांना कौतुकाची वाटते.

त्याने इतक्या लहान वयातच पदवी संपादन करून अनेकांना प्रेरणा दिली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याच्या आईने म्हटले आहे की त्याला अभ्यास करणे आवडत असले तरी तो पुस्तकातला किडा नाही. त्याला खेळ, मौजमस्ती करणेही आवडते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो एक दयाळू वृत्ती असलेला मुलगा आहे. इलियटला आता डॉक्टरेट मिळवण्याची इच्छा आहे.

Back to top button