अंटार्क्टिकाच्या बर्फाखाली पाण्याचे भांडार | पुढारी

अंटार्क्टिकाच्या बर्फाखाली पाण्याचे भांडार

न्यूयॉर्क : अंटार्क्टिका खंडावर बर्फाची जणू काही चादरच अंथरलेली आहे. मात्र, या पांढर्‍याशुभ— बर्फाच्या स्तराखाली निळेशार पाणीही दडलेले आहे. स्क्रिप्स इन्स्टिट्यूशन ऑफ ओशियनोग्राफी आणि कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी म्हटले आहे की अंटार्क्टिकाच्या या बर्फाखाली पाण्याचे भांडारच आहे. तिथे इतके पाणी आहे की या पाण्याचा स्तर जगातील सर्वात उंच पुतळा असलेल्या गुजरातच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ इतक्या उंचीचा होऊ शकतो!

संशोधकांनी अलीकडेच याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी पश्‍चिम अंटार्क्टिकामध्ये बर्फाखाली हे पाण्याचे भांडार शोधून काढले. हे पाणी हवामान बदलाच्या दुष्परिणाचे फलितही असू शकते असे त्यांना वाटते. जर अंटार्क्टिकामधून हे पाणी बाहेर काढले तर त्यापासून 220 ते 820 मीटर खोलीचे सरोवर तयार होऊ शकते. तसेच भारतातील सरदार वल्‍लभभाई पटेल यांच्या पुतळ्याइतका म्हणजेच स्टॅच्यू ऑफ युनिटीइतका (182 मीटर) पाण्याचा स्तर सहजपणे होऊ शकेल. संशोधकांना हा पाण्याचा स्रोत ‘व्हिलन्स आईस स्ट्रीम’च्या जवळ मिळाला आहे. मात्र, या खंडावर असे अनेक स्रोत असू शकतात. ‘सायन्स’ नावाच्या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार अंटार्क्टिकात हे भूजलही असू शकते. मात्र, याबाबत अधिक संशोधनाची गरज आहे. अंटार्क्टिकामध्ये समुद्राचा स्तर 57 मीटरपर्यंत वाढण्याचीही शक्यता आहे.

Back to top button