प्रारंभिक गर्भाशय कर्करोग निदानासाठी नवे उपकरण | पुढारी

प्रारंभिक गर्भाशय कर्करोग निदानासाठी नवे उपकरण

नवी दिल्ली : कर्करोग हा एक जीवघेणा आजार आहे आणि त्याचेही अनेक प्रकार असतात. मात्र, आता वेगवेगळ्या प्रकारच्या कर्करोगांचे निदान व उपचार याबाबत अधिक संशोधन झाल्यामुळे रुग्णांना लाभ मिळत आहे.

आता भारतीय संशोधक गर्भाशय कर्करोग याचे सुरुवातीच्या टप्प्यातच निदान करण्यासाठी एक ‘पॉईंट-ऑफ-केअर डिव्हाईस’ विकसित करीत आहेत.

अनेक प्रयत्नांनंतरही गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रारंभिक स्थितीत निदान करणे हे एक आव्हानच असते.

आता आयआयटी मद्रासमधील संशोधकांनी चेन्नईतील कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने हे ‘पॉईंट-ऑफ-केअर’ उपकरण विकसित करण्याचे कार्य सुरू केलेले आहे.

ते गर्भाशयाच्या कर्करोगाचे सुरुवातीच्या टप्प्यातच निदान करण्यासाठी उपयुक्त ठरेल. महिलांमधील कर्करोगांमध्ये गर्भाशयाचा कर्करोग सातव्या क्रमांकावर आहे. कर्करोगाने होणार्‍या मृत्यूंमध्ये तो आठव्या स्थानावर येतो.

2020 मध्ये जगभरात गर्भाशयाच्या कर्करोगाचे एकूण 3,14,000 रुग्ण समोर आले होते. त्यापैकी 44 हजार रुग्णांची भारतातच नोंद झाली होती.

2020 मध्ये जगभरात गर्भाशयाच्या कर्करोगाने मृत्युमुखी पडणार्‍या महिलांची संख्या होती 2,07,000. त्यापैकी 32,077 महिला भारतातील होत्या.

गर्भाशय कर्करोग हा एक प्रकारे ‘सायलंट किलर’च असतो. त्याची सुरुवातीच्या टप्प्यात विशेष लक्षणे दिसत नाहीत. रोग बळावल्यावरच त्याची लक्षणे दिसू लागतात.

त्यामुळे उपचार करण्यासाठी व रुग्णाचे जीव वाचवण्यासाठी अनेक अडचणी येतात. आता आयआयटी मद्रास व ‘डब्ल्यूएआय’चे हे नवे उपकरण रुग्णांसाठी दिलासादायक ठरू शकते.

Back to top button