कोव्हिडवरील अश्वगंधा च्या वापरासाठी भारत-ब्रिटनचे संयुक्त संशोधन - पुढारी

कोव्हिडवरील अश्वगंधा च्या वापरासाठी भारत-ब्रिटनचे संयुक्त संशोधन

नवी दिल्ली : आयुर्वेदामध्ये अश्वगंधा या वनौषधीचा तणाव कमी करण्यासाठी तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयोग केला जातो. कोरोना महामारीच्या काळात जगभरातील अनेक तज्ज्ञांचे लक्ष भारतीय पारंपरिक उपचार पद्धतीकडेही गेले आहे.

अलीकडेच केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने ‘कोव्हिड’वरील उपचारामध्ये अश्वगंधा चा कसा लाभ होऊ शकतो याबाबतचे संशोधन करण्यासाठी ब्रिटनच्या लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिन (एलएसएचटीएम) बरोबर एक करार केला आहे.

आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत येणार्‍या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान (एआयआयए) व ‘एलएसएचटीएम’ने ब्रिटनच्या लेसिस्टर, बर्मिंघम आणि लंडन (साऊथ हॉल आणि वेम्बले) या तीन शहरांमध्ये दोन हजार लोकांवर अश्वगंधाचे वैद्यकीय परीक्षण करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली आहे. हे संशोधन ‘एलएसएचटीएम’चे डॉ. संजय किनरा यांच्या नेतृत्वाखाली होईल.

तसेच ‘एआयआयए’च्या संचालिका डॉ. तनुजा मनोज नेसारी आणि या योजनेतील आंतरराष्ट्रीय योजनांचे समन्वयक डॉ. राजगोपाल यामध्ये सह-अन्वेषक असतील.

डॉ. तनुजा नेसारी यांनी सांगितले की एक हजार लोकांना तीन महिन्यांपर्यंत अश्वगंधाच्या गोळ्या दिल्या जातील. तितक्याच लोकांना तत्सम अन्य गोळ्या दिल्या जातील. कुणाला कोणत्या गोळ्या दिल्या हे रुग्णाला तसेच डॉक्टरांनाही समजू दिले जाणार नाही. त्यानंतर या उपचाराचे परिणाम तपासून पाहण्यात येतील.

Back to top button