वॉशिंग्टन : मंगळावर जाण्यासाठी मोजा एक लाख डॉलर्स! | पुढारी

वॉशिंग्टन : मंगळावर जाण्यासाठी मोजा एक लाख डॉलर्स!

वॉशिंग्टन : मंगळावर मनुष्य वसाहत स्थापन करण्याचे स्वप्न पाहणार्‍या एलन मस्क यांनी आता मंगळावर जाण्यासाठीच्या तिकिटाचा दरही सांगितला आहे. या तिकिटाची किंमत आहे एक लाख डॉलर्स! अर्थात हे केवळ मंगळावर जाण्यासाठीचे तिकीट आहे, परतीचे नाही!
‘स्पेस एक्स’ कंपनीचे सीईओ असलेल्या मस्क यांनी मंगळावरील मानव वसाहतीबाबतचे धोकेही सांगितले आहेत. त्यांनी सांगितले, तेथील पहिल्या निवासींना कठीण आणि खडतर परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. त्यासाठी त्यांनी तयार राहणे गरजेचे आहे.

टीईडी कॉन्फ्रेसेजचे प्रमुख ख्रिस अँडरसन यांच्याशी बातचित करताना त्यांनी सांगितले की मंगळावरील मानव मोहीम ही दुबळ्या मनाच्या माणसांसाठी नाही. त्यासाठी वाघाचेच काळीज हवे! ही मोहीम सुरुवातीला ‘शानदार’च असेल असे नाही. मस्क यांनी 2050 पर्यंत मंगळावर मानवी वसाहत स्थापन करण्याचे स्वप्न पाहिलेले आहे. त्यासाठी त्यांची कंपनी ‘स्पेस एक्स’ एक असे रॉकेट विकसित करण्याचा प्रयत्न करीत आहे जे अत्यंत वेगाने माणसाला मंगळभूमीवर पोहोचवू शकेल. मस्क यांनी अँडरसन यांना सांगितले की मंगळावर जाण्यासाठीचे सुरुवातीचे एकतर्फी तिकीट एक लाख डॉलर्सच्या आसपास असू शकते.

अंतराळ पर्यटन करणार्‍यांच्या द‍ृष्टिकोणातून हे बरेच स्वस्तही असल्याचे त्यांचे म्हणणे आहे! या मोहिमेच्या सुरुवातीला एक हजार स्टारशिपचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यांना 2030 ते 2040 च्या दरम्यान दर दोन वर्षांनी काही निश्‍चित संख्येने लाँच केले जाईल. त्यापैकी प्रत्येक स्टारशिपमध्ये शंभरपेक्षा अधिक लोक बसू शकतील. मंगळ ग्रहावर आत्मनिर्भर वसाहत स्थापन करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागेल.

RRR ची स्टोरी ऐकुया कोल्हापूरच्या चौकातून | RRR story And Kolhapur

Back to top button