दोन हजार वर्षांपूर्वीचा ‘कॉम्प्युटर’ कधी झाला सुरू? | पुढारी

दोन हजार वर्षांपूर्वीचा ‘कॉम्प्युटर’ कधी झाला सुरू?

लंडन : रहस्यमय अशा ‘अँटिकायथेरा’ यंत्रणेला अनेक संशोधक सध्याच्या कॉम्प्युटरची जुनी आवृत्ती म्हणत असतात. हाच जगातील सर्वात जुना किंवा पहिला कॉम्प्युटर असल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे. हा कॉम्प्युटर इसवी सनापूर्वी 22 डिसेंबर 178 या दिवशी ‘सुरू झाला’ असे आता पुरातत्त्व संशोधकांनी म्हटले आहे. दोन हजार वर्षांपूर्वीच्या या कॉम्प्युटरबाबतचे कुतूहल आता वाढलेले आहे.

1901 मध्ये ‘अँटिकायथेरा’ नावाच्या ग्रीक बेटाजवळ समुद्रात रोमन काळातील जहाजाचे अवशेष काही स्पाँज डायव्हर्सना आढळून आले होते. या जहाजातच चप्पल ठेवण्याच्या आकाराचा हा प्राचीन कॉम्प्युटरही होता. त्यामध्ये गियर्स, डायल्स आणि अनेक प्रकारचा मजकूर लिहिलेला होता. ग्रहणं कधी होणार हे यामधून समजत होते तसेच वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा तसेच अन्य कार्यक्रम कधी होणार हे सुद्धा या यंत्राद्वारे समजून घेत असे. या यंत्राचे अनेक भाग गेल्या अनेक वर्षांच्या काळात संशोधकांनी योग्यरितीने मांडून ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यावरून दोन हजार वर्षांपूर्वीचे त्याचे स्वरूप कसे असेल याचा अंदाज बांधण्यात आला.

त्याची निर्मिती कशी झाली असावी व ते कसे वापरले जात होते हे तपासण्यात आले. या शोधातून अनेक प्रश्न निर्माण झाले. हे यंत्र कुणी बनवले? हे प्रगत विज्ञान असणारे लोक कुठे राहत होते? त्यांनी या यंत्राची निर्मिती का व कशी केली? हे त्यामधील काही प्रश्न आहेत. आता संशोधकांनी हे यंत्र कधी सुरू करण्यात आले हे शोधले आहे. एका ऑनलाईन जर्नलमध्ये त्याची माहिती देण्यात आली आहे. काही संशोधकांच्या मते, हे यंत्र इसवी सनापूर्वी 204 या काळातही सुरू झालेले असू शकते.

Back to top button