Antarctica : अंटार्क्टिकात शिल्‍लक आहे बर्फाचा अखेरचा स्तर! | पुढारी

Antarctica : अंटार्क्टिकात शिल्‍लक आहे बर्फाचा अखेरचा स्तर!

लंडन : अंटार्क्टिकामध्ये मार्चमध्ये तापमानात सामान्यापेक्षा मोठीच वाढ झाली होती व ती 38 अंश सेल्सिअसपर्यंत गेल्यावर लॉस एंजिल्स शहराच्या आकाराचा बर्फाचा एक स्तर वितळून गेला. या अत्याधिक तापमानाचा या घटनेत किती भूमिका राहिली हे नेमकेपणाने वैज्ञानिकांना समजले नसले तरी ‘वातावरणीय नदी’पासून निघालेल्या उष्णतेचा हा परिणाम ठरलेला आहे. ही ‘नदी’ म्हणजे आर्द्रतेचा एक लांब प्रवाह असतो जो उष्ण हवा आणि जलबाष्पाला उष्णकटिबंध क्षेत्रांपासून पृथ्वीच्या अन्य भागांमध्ये घेऊन जातो. अंटार्क्टिकामध्ये बर्फाचा अखेरचा स्तर शिल्‍लक असून तो वितळल्यावर समुद्राच्या पाण्याच्या पातळीत धोकादायक वाढ होऊ शकते.

अंटार्क्टिकामधील बर्फाच्या दोन स्तरांच्या वितळण्याबाबतचे अध्ययन यापूर्वी करण्यात आलेले आहे. हे ‘लारसेन ए’ आणि ‘बी’ नावाचे स्तर अनुक्रमे 1995 आणि 2002 च्या उन्हाळ्यात वितळून गेले होते. अध्ययनानुसार वाढत्या पर्यावरण संकटाने धोक्याला आणखी वाढवले आहे. जसे जसे तापमान वाढत आहे तसे शिल्‍लक राहिलेला सर्वात मोठा स्तर ‘लारसेन सी’वरही धोका वाढत आहे.

‘नेचर’ या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. अंटार्क्टिकामधील बर्फाच्या चादरींना अस्थिर करण्यामागे अनेक कारणे आहे. उष्ण आणि शुष्क हवा थंड हवेच्या वर वाहून नंतर पर्वतांवरून खालील दिशेने वाहू लागते. ही हवाच तापमानातील अचानक आणि नाट्यमय बदलाचे कारण बनते. अंटार्क्टिकामधील बर्फ वितळण्यामागे हेच मोठे कारण आहे. जर ‘लारसेन सी’ हा स्तर वितळून गेला तर तो जगासाठी चिंतेचे कारण बनू शकतो. यामुळे समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वेगाने वाढ होऊ शकते.

Back to top button