सुपरबगपासून संरक्षण देणार नवे अँटिबायोटिक | पुढारी

सुपरबगपासून संरक्षण देणार नवे अँटिबायोटिक

लंडन ः हल्‍ली जुन्या अँटिबायोटिक औषधांना अनेक जीवाणू जुमानत नाहीत असे दिसून आलेले आहे. त्यातही काही जीवाणू असे असतात ते कोणत्याच अँटिबायोटिकना जुमानत नाहीत. अशा जीवाणूंना ‘सुपरबग’ म्हटले जाते. दरवर्षी सुपरबगमुळे सुमारे 70 लाख लोकांना प्राण गमवावे लागतात. मात्र, आता एका नवीन अँटिबायोटिकमुळे हे प्राण वाचू शकतील, असा दावा संशोधकांनी केला आहे.

अँटिबायोटिक औषधांचा अतिरेक झाला किंवा त्यांचे सेवन चुकीच्या पद्धतीने केले तर सुपरबगवर कोणताही परिणाम होत नाही. हे जीवाणू त्याविरुद्ध आपली प्रतिकारशक्‍ती विकसित करीत असतात. आता बि—टनच्या संशोधकांनी असे घातक जीवाणू नष्ट करण्यासाठी एका नव्या अँटिबायोटिकची निर्मिती केली आहे. लिव्हरपूल विद्यापीठाच्या संशोधकांनी बनवलेल्या या अँटिबायोटिकची चाचणी उंदरांवर करण्यात आली.

उंदरांच्या कोणत्याही निरोगी पेशींची हानी न करता या अँटिबायोटिकने आपले काम चोखपणे बजावले. हे नवे अँटिबायोटिक ‘टिक्सोबेक्टिन’चे सिंथेटिक रूप आहे. उंदरांमधील ‘एमआरएसए’ नावाच्या सुपरबगला मारण्यात ‘टिक्सोबेक्टिन’ यशस्वी ठरले. या सुपरबगला नष्ट करण्यात आतापर्यंत अनेक अँटिबायोटिक अपयशी ठरले होते. हे अँटिबायोटिक मानवी शरीरात आढळणार्‍या अनेक घातक जीवाणूंना नष्ट करू शकते.

2015 मध्येच अमेरिकेतील एका राज्यात या औषधाबाबतची माहिती समोर आली होती. मात्र, सामान्य लोकांना त्याबद्दल काही सांगितले गेले नव्हते. याचे कारण म्हणजे त्याचे उत्पादन त्यावेळी महागडे होते. आता संशोधकांनी त्या तुलनेत 2 हजार पट कमी खर्चात सिंथेटिक रूप बनवण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे आता ‘टिक्सोबेक्टिन’चे मोठ्या प्रमाणात उत्पादन शक्य होईल.

हेही वाचलंत का? 

Back to top button