तेलंगणामध्ये 1200 कोटींच्या भव्य यदाद्री मंदिराचे उद्घाटन | पुढारी

तेलंगणामध्ये 1200 कोटींच्या भव्य यदाद्री मंदिराचे उद्घाटन

हैदराबादः आंध प्रदेशपासून वेगळे झाल्यावर तेलंगणाला तिरुपतीसारख्या मंदिराची उणीव भासत होती. आता भगवान नृसिंहदेवांशी संबंधित या क्षेत्रात तब्बल 1200 कोटी रुपये खर्च करून श्री लक्ष्मी-नृसिंहाचे भव्य ‘यदाद्री’ मंदिर उभे करण्यात आले आहे. या मंदिराचे सोमवारी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी उद्घाटन केले व ते सर्व भाविकांसाठी खुले करण्यात आले. काळ्या ग्रॅनाईट शिळांपासून बनवलेल्या या मंदिरावर 140 किलोचे सोनेही जडवण्यात आले आहे. यापैकी 125 किलो सोने गर्भगृहावरील विमान गोपूरमवर लावलेले आहे. मंदिराचे दगड असे आहेत की एक हजार वर्षे मंदिर सुरक्षित राहू शकते.

तेलंगणाच्या यदाद्री भुवनगिरी जिल्ह्यात भगवान नृसिंहाचे एक हजारपेक्षाही अधिक वर्षांपूर्वीचे जुने व प्रसिद्ध मंदिर आहे. या पर्वतावरील गुहेत ज्वाला नृसिंह, गंधभिरंदा नृसिंह आणि योगानंद नृसिंह यांचे विग्रह आहेत. यदाद्रीगुट्टा पर्वतावर 510 फूट उंचीवर ही बारा फूट उंच आणि तीस फूट लांबीची गुहा आहे. तिथेच आता हे नवे भव्य मंदिर उभे राहिले आहे. प्राचीन शास्त्रांनुसार या मंदिराची उभारणी करण्यात आली असून आनंद साई यांनी त्याचे डिझाईन बनवले आहे. मंदिराचे जुने गर्भगृह तसेच कायम ठेवून अन्य भागाचा कायापालट करीत हे नवे मंदिर उभे करण्यात आले.

काळ्या ग्रॅनाईट दगडांना जोडण्यासाठी सिमेंट-वाळूऐवजी चुना म्हणजेच लाईम मोर्टार मॅथेडचा वापर करण्यात आला. गर्भगृहाचा दरवाजा सोन्याने मढवलेला असून त्याच्या आजुबाजूला जय-विजय स्तंभ आहेत. दहा किलो सोने ध्वजस्तंभ आणि मुख्य द्वारासाठी वापरले आहे. गर्भगृहाच्या समोरच 34 फुटांचा ध्वजस्तंभ आहे. 21 ते 28 मार्चपर्यंत होमहवन व अन्य धार्मिक विधी झाले, त्यानंतर हे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.

हेही वाचलंत का? 

Back to top button