मॉस्को ः रशियाने युक्रेनबरोबर सुरू केलेल्या युद्धामुळे सध्या अनेक देशांनी रशियावर विविध प्रकारचे निर्बंध लादले आहेत. त्याशिवाय अंतराळ संशोधन क्षेत्रातही रशियावर या युद्धाचा विपरीत परिणाम होत आहे. आता युरोपियन स्पेस एजन्सीने मंगळ मोहिमेतून रशियाला बाहेर काढले आहे. या मोहिमेत रशियन शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांची मदत घेतली जाणार नाही.
ही मोहीम सुमारे 8433 कोटी रुपयांची आहे. त्यामध्ये युरोपियन देशांसह रशियाचाही समावेश होता. 'ईएसए' आणि रशियाच्या 'रॉसकॉसमॉस'कडून सप्टेंबरमध्ये 'एक्झोमार्स' चे प्रक्षेपण केले जाणार होते. आता युरोपियन स्पेस एजन्सीने एक निवेदन प्रसिद्ध करून म्हटले आहे की, रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे तसेच रशियावर लादलेल्या निर्बंधांमुळे मंगळावर रोव्हर पाठवण्याच्या तयारीत असलेली रशियन-युरोपियन मोहीम रद्द करण्यात आली आहे.
एजन्सीने आपली एक्सोमार्स मोहीम रद्द केल्याची पुष्टी करताना युक्रेनमधील युद्धामुळे झालेल्या जीवितहानी आणि इतर नुकसानीचा निषेध केला. एक्सोमार्स मोहीम यावर्षी सप्टेंबरमध्ये सुरू होणार होती. त्यासाठी रशियन प्रक्षेपकातून रोव्हर मंगळावर पाठवले जाणार होते. मंगळावरील मातीच्या नमुन्यांचा अभ्यास करून तेथील जीवसृष्टीच्या खुणा या संशोधनातून शोधल्या जाणार होत्या.
हेही वाचलंत का?