आता अंतराळातून होणार वस्तूपुरवठा! | पुढारी

आता अंतराळातून होणार वस्तूपुरवठा!

न्यूयॉर्क : सध्याच्या ‘हायटेक’ जमान्यात घरपोच वस्तूपुरवठ्यासाठीही नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. अगदी ड्रोन किंवा रोबोचाही यासाठी वापर केला जात आहे. आता अमेरिकेतील एका स्टार्टअपने यासाठी खास एक स्पेस कॅप्सूल डिझाईन केले आहे. ते बाह्य अवकाशातून जगाच्या कानाकोपर्‍यात वस्तू पोहोचवण्याचे काम करील.

‘इन्व्हर्शन स्पेस’ नावाच्या या कंपनीने म्हटले आहे की आपल्या नवीन स्पेस कॅप्सूलद्वारे जगात कुठेही अंतराळातून वस्तू पोहोचवता येतील. ही कंपनी लॉस एंजिल्समध्ये वर्षभरापूर्वीच सुरू झालेली आहे. कंपनीने 2021 मध्ये अंतराळातून पृथ्वीवर सामग्री आणणारे रीएंट्री कॅप्सूल विकसित करण्यासाठी 1 कोटी डॉलर्स उभे केले आहेत.

कंपनीला हे रिटर्न व्हेईकल कमर्शियल आणि डिफेन्स इंडस्ट्रीजसाठी बनवायचे आहे, ज्यामुळे जागतिक पुरवठा वितरण तसेच स्पेस स्टेशनवर आणि तेथून पुरवठा आणि परत येण्यास मदत होईल. हे पुन्हा वापरता येण्याजोगे कॅप्सूल अंतराळातून अनेकवेळा येण्यास सक्षम असेल आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापर्यंत वस्तू पोहोचविण्यासाठीही सक्षम असेल. अशा प्रयत्नांना चालना देण्यासाठी ‘नासा’ही संशोधन करीत असून खासगी क्षेत्राला प्रोत्साहन देत आहे. पुन्हा वापरता येण्याजोग्या कॅप्सूल नवीन स्पेस मार्केटमध्ये मोठे योगदान देऊ शकतात.

सध्या, कंपनी या आकाराच्या सुटकेसमध्ये बसणारे सामान वाहून नेऊ शकणारे चार फूट व्यासाचे कॅप्सूल विकसित करण्यासाठी काम करीत आहे. या विशिष्ट प्रकारची सुटकेस आणि त्याची यंत्रणा 2025 पर्यंत विकसित होण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी अभियंते दीड फूट व्यासाच्या कॅप्सूलची चाचणी घेत आहेत. त्याला ‘रे’ असे म्हटले जाते. ‘इन्व्हर्शन’ने नुकतीच रेची पॅराशूट चाचणी घेतली. ज्यामध्ये 30 हजार फूट उंचीवरून विमानातून बशीसारखी वस्तू सोडण्यात आली. ज्यावेळी ही प्रणाली पूर्णपणे विकसित होईल, त्यावेळी हे यान पृथ्वीच्या बाह्य वातावरणाला ध्वनीच्या 25 पट वेगाने धडकेल आणि सॉफ्ट लँडिंगसाठी पॅराशूट वापरेल.

Back to top button