पंजाब : साडेतीन वर्षांच्या बालकाला तीसपर्यंतचे पाढे पाठ! | पुढारी

पंजाब : साडेतीन वर्षांच्या बालकाला तीसपर्यंतचे पाढे पाठ!

लुधियाना : पंजाब मधील साडेतीन वर्षांच्या कुंवर प्रताप सिंह या बालकाचा ‘इंटेलिजन्स कोशंट (आयक्यू) म्हणजेच बुद्ध्यांक थक्क करणारा आहे.

इतक्या छोट्या वयातच त्याला दहा वर्षांच्या मुलाला जितके ज्ञान असू शकते तितके असते. साडेतीन वर्षाच्या वयात तीसपर्यंतचे पाढे पाठ करणारा तो जगातील सर्वात छोटा मुलगा ठरला आहे.

त्याच्या शिक्षकांनी म्हटले आहे की, त्याला या वयातच पाचवीतील विद्यार्थ्याइतके ज्ञान आहे. त्याला केवळ पाढेच पाठ आहेत असे नाही. तो प्रत्येक देशाच्या राजधानीचे शहरही अचूक सांगू शकतो तसेच मूळ संख्या (प्राईम नंबर्स) व अन्य बाबतीतील गणिताची उत्तरेही देऊ शकतो. त्याच्या बोलण्या-वागण्यातूनही त्याची बुद्धिमत्ता दिसून येते, असे त्याच्या शिक्षकांचे म्हणणे आहे.

तो ज्या कॉलनीत राहतो तेथील प्रत्येक नागरिकाचा घर नंबर व अन्य तपशील त्याला माहिती आहेत. त्याने अनेक विक्रम केले आहेत. त्याच्या नावाची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्डस्मध्येही समाविष्ट आहे.

एका मिनिटात जगातील 27 ऐतिहासिक स्थळांची माहिती देणे, एका मिनिटात 14 मल्टिप्लिकेशन टेबल्स सोडवणे, 48 सेकंदांत देशाच्या विविध राज्यांच्या राजधान्या सांगणे, 23 मिनिटे 48 सेकंदांमध्ये सर्वाधिक 27 पुस्तके वाचणारी सर्वात लहान वयाची व्यक्ती बनणे, असे विक्रम त्याने केले असून याबाबत ‘इंडिया बुक’ व ‘एशिया बुक’मध्येही त्याच्या नावाची नोंद आहे.

Back to top button