बीजिंग : छोट्या डोक्याच्या डायनासोरचे जीवाश्म | पुढारी

बीजिंग : छोट्या डोक्याच्या डायनासोरचे जीवाश्म

बीजिंग :  संशोधकांनी स्टेगॉसॉर प्रजातीच्या डायनासोरचे अतिशय जुने जीवाश्म शोधले आहे. हे डायनासोर छोट्या डोक्याचे आणि लांब शेपटीचे होते. त्यांच्या शरीरावर मानेपासून शेपटीपर्यंत फ्रीलसारखी रचना होती.

चिलखती कातडे असलेल्या डायनासोरपैकीच ही एक प्रजाती आहे. या नव्या प्रजातीला ‘बाशानोसॉरस प्रायमिटिव्हस’ असे नाव देण्यात आले आहे. 174.1 दशलक्ष ते 163.5 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या मध्य ज्युरासिक काळात हे डायनासोर सध्याच्या चीनच्या भूप्रदेशात वावरत होते. हे शाकाहारी डायनासोर कदाचित आशियातच निर्माण झाले असावेत असे संशोधकांना वाटते. ही नवी प्रजाती स्टेगोसॉरियामधील अगदी सुरुवातीच्या काळातील प्रजाती होती.

चीनमधील चोंगकिंग लॅबोरेटरी ऑफ जिओहेरिटेज प्रोटेक्शन अँड रिसर्चमधील निंग ली या संशोधकाने याबाबतची माहिती दिली. आग्नेय चीनमधील चोंगकिंग येथे झेंग झू नावाच्या एका मेंढपाळाला 2015 मध्ये या डायनासोरचे हाड सापडले होते. हे हाड एखाद्या खडकासारख्या जीवाश्माच्या रूपात होते. या लाओजुन नावाच्या गावात रितसर उत्खनन सुरू करण्यात आले व तिथे डायनासोरची सुमारे पाच हजार हाडे सापडली. त्यावर संशोधन सुरू झाले आणि डायनासोरची ही नवी प्रजाती समोर आली.

Back to top button